अरे हा तर तरुणपणीचा सलमान खान! हुबेहूब भाईजानसारखा दिसतोय 'या' निर्मात्याचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:52 IST2026-04-25T15:51:22+5:302026-04-25T15:52:04+5:30
सूफयानला पाहताच चाहत्यांना ९० च्या दशकातील तरुण सलमान खानची आठवण झाली

अरे हा तर तरुणपणीचा सलमान खान! हुबेहूब भाईजानसारखा दिसतोय 'या' निर्मात्याचा मुलगा
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सूफयान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा लूक पाहून सर्वांना तरुणपणीच्या सलमान खानचीच आठवण झाली आहे. 'दिसायला हुबेहूब सलमान खानच' अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. नुकताच सूफयान मुंबईत पापाराझींसमोर आला आणि त्याचा लूक पाहून सर्वांनाच धक्का बसला. सूफयानला पाहताच चाहत्यांना ९० च्या दशकातील तरुण सलमान खानची आठवण झाली असून, त्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
सूफयानचा चेहरा, त्याचे हावभाव, लूक्स आणि शरीरयष्टी हुबेहूब तरुणपणातील सलमान खानसारखी दिसत असल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. निळ्या रंगाचा फिटिंग टी-शर्ट, जीन्स आणि कानात बाळी अशा 'भाईजान' स्टाईलमध्ये तो दिसला. अनेक युजर्सनी त्याला 'सलमान खानचा यंगर व्हर्जन' असे म्हटले असून, काहींनी तर त्याची तुलना टॉम हॉलंड आणि विजय वर्माशीही केली आहे. मात्र, जास्तीत जास्त लोकांनी सलमान खानशीच त्याची तुलना केली आहे.
सूफयान हा साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांचा धाकटा मुलगा आहे. त्याचा मोठा भाऊ सुभान लवकरच 'ऐसी दीवानगी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सूफयानचा सध्या चित्रपटात येण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे समजते. तरीही त्याच्या या लूकमुळे भविष्यात तो पडद्यावर दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ मध्ये सूफयानचे नाव प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरसोबत जोडले गेले होते. एका फिल्म स्क्रीनिंगच्या वेळी ते एकत्र दिसल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सईने या बातम्या फेटाळून लावल्या असून सूफयान हा तिचा लहानपणापासूनचा चांगला मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या तरी सुफयान आपल्या 'सलमान खान' लूकमुळेच सोशल मीडियाचा नवा क्रश बनला आहे.