कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:03 AM2020-08-21T11:03:03+5:302020-08-21T11:07:35+5:30

पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

भारताला अणुबॉम्बची धमकी देत पाकिस्तानने कुटील डाव खेळला आहे. एकीकडे सौदी अरेबियाने इंधन देण्यास नकार देत झटका दिल्याने पाकिस्तानची चीनसोबत जवळीक वाढू लागली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीने एका दिवसाचा चीन दौरा केला असून बिजिंगला न जाता ते हेनानला गेल्याने संशयात भर पडली आहे. कारण चीनचा युद्धनौकांचा सर्वात मोठा तळ हा हेनानमध्येच असून कुरेशी या तळावरच पोहोचले आहेत.

कुरेशी यांनीदेखील चीनचा हा दौरा खूप महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. याचा उद्देश 'आयरन ब्रदर्स'सोबत रणनीतिक समझोता आणखी मजबूत करणे आहे. या दौऱ्यात कुरेशी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

कुरेशी यांनी सांगितले की, या दौऱ्याचा उद्देश पाकिस्तानच्या राजनैतिक आणि सैन्य नेतृत्वाच्या लक्ष्याला दाखविणे आहे. हिंदुस्थान टाईम्सनुसार कुरेशी तीन योजना घेऊन चीनला केले आहेत. यामध्ये गेल्या वर्षी पाकिस्तानी लष्करासोबत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सहकार्य आणि ताकद वाढविण्यासाठी बांधणी समझोता आहे.

पाकिस्तानी सेना पीएलएसोबत संबंध आणखी मजबूत करू इच्छित आहे. यासाठी पाकिस्तान एक संयुक्त सैन्य आयोग बनवू इच्छित आहे. वेळ पडल्यावर दोन्ही सैन्यांमध्ये रणनितीक निर्णय घेता यावेत हा यामागचा पाकिस्तानी लष्कराचा डाव आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनचे लष्कर गरज पडल्यास एकत्र येतील.

याशिवाय पाकिस्तानचे इम्रान खान सरकार चीनसोबत इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला वेग देण्यासाठी चर्चा करणार आहे. यासाठी पाकिस्तानला मोठी रक्कम चीनकडून मिळणार आहे.

कुरेशी यांच्या मनात काही वेगळेच आहे. सिंध, पीओके आणि गिलगिट बाल्टीस्तानमध्ये चीनने पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असा मुख्य प्लॅन आहे. पीओके आणि गिलगिट बाल्टीस्तानवर पाकिस्तानचा कब्जा आहे आणि हा भारताचा भाग आहे.

चीन तब्बल 60 अब्ज डॉलर खर्चून पाकिस्तानपर्यंत रस्ता आणि रेल्वेमार्ग बनवत आहे. याद्वारे पाकिस्तानच्या ग्वादर पोर्टवरून चीनचा शिनजियांग प्रांत जोडला जाणार आहे.

पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

चीनने काश्मीर मुद्द्यावर हरतऱ्हेची मदत करण्याचे आश्वासन पाकिस्तानला दिले आहे. हा मुद्दा पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत उचलला जाणार आहे. यासाठी चीनने मदत करावी असे पाकिस्तानला वाटत आहे.