महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:52 IST2026-05-13T14:39:08+5:302026-05-13T14:52:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोने खरेदी चर्चेत आली आहे. पंतप्रधानांनी पुढील वर्षभर सोने खरेदी न करण्यास सांगितले. पण, केंद्र सरकारवर हे सांगण्याची वेळ का आली?

पश्चिम आशियातील तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यामुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सोन्याची आयात २४ टक्क्यांनी वाढून ७१.९८ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, सोन्याची प्रत्यक्ष मात्रा घटली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील गगनाला भिडलेल्या किमतीमुळे भारताला यासाठी मोठी परकीय चलन साठा खर्च करावा लागला आहे.

सोन्याचे प्रतिकिलो दर २०२४-२५ मधील ७६,६१७ डॉलर वरून २०२५-२६ मध्ये जवळपास ९९,८२५ डॉलर इतके वाढले. त्यामुळे कमी प्रमाणात आयात होऊनही एकूण आयातमूल्य झपाट्याने वाढले.

दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर दीड लाख रुपयांच्या आसपास पोहोचल्याने सामान्य ग्राहकांवरही ताण वाढला आहे.

आर्थिक संशोधन संस्था जीटीआरआयने भारत-यूएई मुक्त व्यापार कराराचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. शुल्क कपातीनंतर दुबईमार्गे भारतात येणाऱ्या सोन्यावर प्रभावी शुल्क केवळ ५ टक्क्यांपर्यंत आले आहे.

















