लंडनमध्ये वर्षाला तब्बल १ कोटी रुपये कमावणाऱ्या भारतीय वंशाच्या श्वेता देसाई यांनी जेव्हा ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी आपली हाय-प्रोफाइल नोकरी सोडली, तेव्हा पुढील प्रवास इतका कठीण असेल याची त्यांना कल्पना नव्हती. नवीन ठिकाणी मनासारखी नोकरी न मिळाल्याने त्यांनी शेवटी 'एअरबीएनबी' (Airbnb) अपार्टमेंट्सची साफसफाई आणि मॅनेजमेंटचं काम सुरू केलं. सुरुवातीला हा बदल त्यांच्यासाठी खूप क्लेशदायक होता, परंतु हळूहळू त्यांना समजलं की कोणतंही काम छोटं नसतं. आज श्वेता मुलांना इंग्रजी शिकवण्यासोबतच महिलांसाठी 'सपोर्ट कम्युनिटी' आणि कोचिंग प्रोग्रामही चालवत आहेत. आर्थिक स्वातंत्र्यच माणसाला खरी ओळख देतं असं श्वेता यांचं ठाम मत आहे.
मुंबई ते लंडन असा प्रवास
श्वेता यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं आहे. २००८ मध्ये त्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. तिथे त्यांनी मेहनतीने आपलं करिअर घडवलं आणि एका मोठ्या कंपनीत 'प्रोडक्ट हेड' या पदापर्यंत मजल मारली. त्यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपये होतं. आलिशान जीवनशैली, महागडे कपडे आणि डिझायनर बॅग्स अशा सर्व सुखसोयी त्यांच्याकडे होत्या. त्या आपल्या आयुष्यात अत्यंत सुखी होत्या.
२०२३ मध्ये त्यांच्या पतीला मेलबर्नमध्ये नोकरी मिळाली. कुटुंबासोबत राहण्यासाठी श्वेता यांनी लंडनमधील आपली नोकरी सोडली आणि त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या. तिथेही सहज चांगली नोकरी मिळेल असा त्यांना विश्वास होता, पण वास्तव वेगळं निघालं. मेलबर्नचे जॉब मार्केट लंडनपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं आणि त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकली नाही.
अपार्टमेंट्सच्या साफसफाईचं काम
बराच काळ प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागलं नाही, तेव्हा त्यांनी अपार्टमेंट्सची साफसफाई आणि मॅनेजमेंट करण्याचं काम सुरू केलं. यात घरं स्वच्छ करणं, बेडशीट्स बदलणं, कपडे धुणं आणि पाहुण्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं या कामांचा समावेश होता. सुरुवातीला हे काम करताना श्वेता यांना खूप अवघडलेपणा जाणवायचा. ज्या महिलेने मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम केलं होतं, ती आता घरं झाडत होती. या विचाराने त्या मनातून खचल्या होत्या.
'तुम्ही काय करता?' या प्रश्नाची भीती
श्वेता सांगतात की, जेव्हा लोक त्यांना विचारायचे की "तुम्ही काय करता?", तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसायचं. कधी त्या स्वतःला गृहिणी म्हणायच्या, तर कधी काहीतरी नवीन शिकत असल्याचं सांगायच्या. पण आतून त्यांना आपण आपली ओळख गमावल्यासारखं वाटायचं. पूर्वी लोक त्यांना त्यांच्या हुद्द्यावरून आणि पगारावरून ओळखायचे, पण आता सर्व काही बदललं होतं.
कोणतंही काम छोटं नसतं
हळूहळू श्वेता यांना जाणीव झाली की, माणसाची ओळख फक्त नोकरी किंवा पैशाने होत नाही. अपार्टमेंट साफ करण्याचं कामही सन्मानाचं आहे, कारण त्यातून लोकांना सेवा मिळते. या कामाने त्यांना स्वतःला पुन्हा शोधण्यास मदत केली. आता श्वेता फक्त साफसफाईच करत नाहीत, तर मुलांना इंग्रजीही शिकवतात. याशिवाय त्या स्वतःचा व्यवसाय आणि कोचिंग प्रोग्रामही सुरू करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत.
महिलांसाठी विशेष कम्युनिटी
श्वेता यांनी 'द रीबिल्ड रूम' (The Rebuild Room) नावाने एक व्हॉट्सअॅप कम्युनिटी सुरू केली आहे. ही कम्युनिटी अशा महिलांसाठी आहे ज्या आयुष्यात मोठ्या बदलांमधून जात आहेत—जसे की नोकरी जाणं, दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थलांतर करणं किंवा स्वतःच्या ओळखीसाठी संघर्ष करणं. या कम्युनिटीत महिला एकमेकींना आधार देतात आणि आपले अनुभव शेअर करतात.
पैसा म्हणजेच स्वातंत्र्य
श्वेता म्हणतात की, बेरोजगारी आणि संघर्षाच्या या काळाने त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला. पैसा महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला आपल्या आवडीचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य देतो. त्यांच्या मते, पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाही, तर तो आत्मविश्वास आणि स्वावलंबन देतो. पूर्वी त्या स्वतःच्या पदालाच आपली ओळख मानत होत्या, पण आता त्यांना समजलं आहे की माणसाची किंमत त्याच्या हुद्द्यावरून नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वावरून आणि मेहनतीवरून ठरते. आज श्वेता आपल्या आयुष्यात पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आहेत.
