अधिक मास विशेष २०२६ : वाणाचे अनारसे जमतील परफेक्ट लक्षात ठेवा ५ टिप्स, खुसखुशीत अनारसे करा घरीच...
Updated:May 13, 2026 16:06 IST2026-05-13T15:52:21+5:302026-05-13T16:06:22+5:30
how to make perfect anarsa for adhikmass 2026 : how to make perfect anarsa at home : खास जावयासाठी पारंपारिक पद्धतीने जाळीदार, खुसखुशीत अनारसे करण्यासाठी टिप्स...

how to make perfect anarsa at home
अधिकमास, ज्याला आपण 'धोंड्याचा महिना' म्हणूनही ओळखतो. खरंतरं, आपल्याकडे अधिकमासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाला 'विष्णू' स्वरूप मानून त्याचे सासरी कोडकौतुक करण्याची, वाण देण्याची आणि लाड करण्याची फार जुनी परंपरा आहे. जावयाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये आणि अन्नपदार्थांमध्ये कुरकुरीत, खुसखुशीत अनारस्यांना विशेष मानाचे स्थान असते(Tips For Making Perfect Anarasa At Home).
how to make perfect anarsa for adhikmass
अनारसा हा केवळ एक पदार्थ नसून तो अधिकमासाच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. पण, अनारसे बनवणं हे एक मोठं कसब आहे; कधी ते तेलात विरघळतात तर कधी चामट होतात. त्यामुळे अनारसे करताना काही खास गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. चविष्ट, जाळीदार आणि परफेक्ट अनारसे बनवण्यासाठी काही खास टिप्स...अधिकमासात जावयासाठी खास जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे करण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा.
१. तांदळाची योग्य निवड :-
अनारशासाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा (शक्यतो कोलम, बासमती तुकडा किंवा रेशनचा तांदूळ). नवीन तांदळाचे अनारसे चामट होतात किंवा तेलात विरघळण्याची शक्यता असते. अनारसांसाठी वापरले जाणारे तांदूळ किमान ३ दिवस भिजत ठेवावेत. दररोज पाणी बदलल्याने तांदळाला चांगला आंबूसपणा येतो आणि अनारसे जाळीदार होतात.
२. योग्य वाळवण :-
तांदूळ धुवून निथळल्यानंतर ते कडक उन्हात वाळवू नका. सावलीत सुती कापडावर फक्त ३ ते ४ तास पसरावेत जेणेकरून त्यात थोडा ओलावा राहील. भिजवलेले तांदूळ सावलीत थोडे ओलसर असतानाच दळावेत. त्यामुळे पीठ मऊ राहते आणि अनारसे चांगले होतात.
३. गुळाचे योग्य प्रमाण :-
पीठ दळल्यानंतर त्यात गूळ घालताना प्रमाण नीट मोजावे. साधारणपणे १ वाटी पिठाला ३/४ वाटी गूळ हे प्रमाण योग्य ठरते. गूळ पिठात नीट मुरला की अनारसे छान फुलतात. पिठात गूळ घालताना तो किसूनच घालावा म्हणजे पीठ मळताना सोपे जाते आणि ते व्यवस्थित पटकन मळून होते. जास्त गूळ घातल्यास अनारसे तेलात फुटू शकतात. त्यामुळे तांदळाच्या पिठाच्या प्रमाणानुसार गूळ वापरणे महत्त्वाचे आहे.
४. खसखस लावण्याची ट्रिक :-
अनारसा थापताना एका बाजूला भरपूर खसखस लावावी. खसखस लावलेली बाजू वरच्या बाजूला ठेवूनच अनारसा तेलात सोडावा, जेणेकरून त्याला सुंदर जाळी पडते. याचबरोबर, अनारसाचे पीठ तयार केल्यानंतर काही तास झाकून ठेवावे. यामुळे अनारसांना चांगली जाळी येण्यास मदत होते.
५. हाताला तूप लावून थापा :-
अनारसे थापताना हाताला हलके तूप लावल्यास पीठ चिकटत नाही आणि आकार छान येतो.
६. तेलाचे तापमान योग्य असावे :-
खूप गरम तेलात अनारसे टाकल्यास ते पटकन काळे पडू शकतात. मध्यम आचेवर तळल्यास अनारसे छान खुसखुशीत होतात. अनारसे कधीही हाय फ्लेमवर तळू नका. मंद आचेवर वरून गरम तेल चमच्याने घालत तळल्यास त्याला एकसमान रंग आणि खुसखुशीतपणा येतो.
७. अधिक चविष्ट होण्यासाठी :-
पीठ घट्ट असेल तर तुपाचा हात लावून मळावे किंवा खूपच कोरडे लागतं असेल तर केळं (१ लहान तुकडा) त्या पिठात कुस्करुन मिक्स करावे.
८. पीठ पातळ झाल्यास :-
अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्या दिवशी अनारसे करा. याचबरोबर, पीठ पातळ झाले तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा दोन दिवस भिजत ठेवा मग अनारसे बनवा.
९. अनारसे तेलात विरघळत असतील तर :-
अनारसे तळताना विरघळत असतील तर कोरड्या पिठात २ चमचे गरम तूप घातल्याने ते कुरकुरीत मस्त हलके जाळीदार होतात. अनारसे पीठ व्यवस्थित मुरले तरच अनारसे विरघळत नाही त्यामुळे ते चांगले भिजू द्यावे आणि त्यानंतरच या पिठाचे अनारसे बनवावेत.