तिशी आली? आवडत नसले तरी 'हे' पदार्थ खायला सुरुवात करा, भविष्यातला दवाखान्याचा खर्च वाचेल
Updated:May 13, 2026 15:46 IST2026-05-13T15:40:33+5:302026-05-13T15:46:23+5:30

वयाची तिशी गाठली की प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत थोडं जागरुक होणं गरजेचं आहे. तीस वर्षांचे झालो म्हणजे खूप वय झालं असा याचा अर्थ मुळीच नाही. पण सध्या चुकीच्या जीवनपद्धतीचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मग खूपच कमी वयात दवाखाना मागे लागतो.
तेच जर टाळायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहाराकडे आपले लक्ष हवे. म्हणूनच एकदा वयाची तिशी ओलांडली की काही पदार्थ आपल्याला आवडत असो किंवा नसो, पण तब्येतीसाठी ते खायलाच हवे. ते नेमके कोणते ते पाहुया...
सगळ्यात पहिला पदार्थ आहे नाचणी. वय जसं वाढतं जातं तशी हाडं कमकुवत होऊ लागतात. ठिसूळ होतात. हे टाळण्यासाठी आणि हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचं आहे आणि ते नाचणीमधून चांगल्या प्रमाणात मिळतात.
भिजवलेले बदाम आणि अक्रोड देखील नियमितपणे खाणं खूप गरजेचं आहे. कारण ते आपल्या मेंदूसाठी फायदेशीर ठरतात. तसेच त्यातून मिळणारे हेल्दी फॅट्स हृदयासाठी चांगले असतात.
शरीरातले हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आणि मेनोपॉजचा त्रास कमी करण्यासाठी महिलांनी नियमितपणे जवस खाणे गरजेचे आहे. त्यातून मिळणारे ओेमेगा ३ देखील शरीरासाठी गरजेचे असते.
हिरव्या पालेभाज्या आणि विशेषत: पालक खायला हवा. कारण त्यातून लोह आणि फाेलेट मिळते. बहुसंख्य महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं. ही कमतरता भरून काढायची असेल तर हिरव्या पालेभाज्या खायलाच हव्या.
सगळ्यात शेवटचा पदार्थ म्हणजे प्रोटीनयुक्त आहार. तुमच्या शरीरात प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतील तरच स्नायू मजबूत आणि शरीर धडधाकट राहील.