पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 09:09 IST2026-05-13T09:07:14+5:302026-05-13T09:09:12+5:30
इराणच्या लष्करी विमानांना अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई दलाच्या तळांवर जागा दिली होती.

पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
वॉशिंग्टन : अमेरिका-इराण युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानने, इराणच्या लष्करी विमानांना अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आपल्या हवाई दलाच्या तळांवर जागा दिली होती. अमेरिकेतील 'सीबीएस न्यूज'ने वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा खळबळजनक दावा केला आहे.
पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळले. नूर खान विमानतळ शहराच्या मध्यभागी आहे, तिथे विमानांचा मोठा ताफा लपवून ठेवणे अशक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेमके काय घडले होते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर लगेचच, इराणने आपली 'रिकॉनिसन्स' (गुप्तचर माहिती काढणारी) आणि अन्य लष्करी विमाने पाकिस्तानच्या नूर खान एअर बेसवर पाठवली होती.
आपली नागरी विमाने वाचवण्यास शेजारील अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळाचा वापर इराणने केला. 'महान एअर'चे विमान युद्ध सुरू होण्यापूर्वीच काबुलमध्ये उतरवले होते.