उठा उठा ऑफिसला जायची वेळ झाली! TCS कंपनीनं केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा, कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 04:21 PM2021-09-17T16:21:15+5:302021-09-17T16:26:57+5:30

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं आता 'वर्क फ्रॉम होम' बंद करत असल्याची घोषणा केलीय. कंपनीनं नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

देशातील बलाढ्य टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीनं कर्मचाऱ्यांचं 'वर्क फ्रॉम होम' पूर्णपणे बंद करत असल्याची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याची तयारी देखील कंपनीनं सुरू केली आहे.

कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कार्यालयीन काम पु्न्हा एकदा सुरू करणार असल्याची घोषणा टीसीएसनं केली आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील जवळपास सर्वच आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली होती. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देऊन कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसचे एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ९७ टक्के कर्मचारी गेल्या दीड वर्षापासून 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत.

आता या वर्षी डिसेंबर किंवा नवंवर्षात टीसीएस कंपनी पुन्हा एकदा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची तयारी करत आहे. देशातील कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट आणि लसीकरण या गोष्टी लक्षात घेऊन आता कार्यालय सुरू करण्याची योजना कंपनीनं आखली आहे.

कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या सूचना याआधीच दिल्या आहेत. सध्या कंपन्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावू शकतात. त्यानुसार कंपनीनं २०२५ सालापर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ २५ टक्के कर्मचारीच वर्क फ्रॉम होम करतील आणि तर सर्व जण कार्यालयात येतील यासाठीचं नियोजन सुरू केलं आहे.

टीसीएस भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असून देशात जवळपास १५ टक्के सॉफ्टवेअर निर्यातीत या कंपनीचं योगदान आहे. कंपनीत सध्या ५ लाखाहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. यातील जवळपास ९७ टक्के कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत.

टीसीएससोबतच इन्फोसिस या आणखी एका मोठ्या कंपनीनं याआधीच आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलवायला सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

इन्फोसिस यापुढील काळात हायब्रिड मॉडलवर काम करत असून यात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येत आहे.

कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्याचं आरोग्य, लसीकरण याची विशेष काळजी कंपनीकडून घेतली जाणार आहे. तसंच कार्यालयात सुरक्षित वातावरण देण्यावर भर दिला जाणार आहे.

Read in English