Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 13:44 IST2026-05-20T10:07:22+5:302026-05-20T13:44:02+5:30
महाराष्ट्रासह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
अमेरिका-इराण यांच्यातील शाब्दिक युद्ध आणि प्रत्यक्ष युद्ध, त्यामुळे भारताला बसत असलेले इंधन दरवाढीचे चटके, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, देशात गाजत असलेलं नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, या आणि अशा महाराष्ट्रासह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
20 May, 26 : 02:32 PM
खुशबू पाटनीचा संताप
अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी देश-विदेशातील विविध मुद्द्यांवर नेहमीच आपलं मत उघडपणे मांडत असते. आता तिने ट्विशा शर्मा आणि दीपिका नागर मृत्यू प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशातील सुशिक्षित मुली लग्नानंतर ज्या प्रकारे आपला जीव गमावत आहेत, ते पाहून खुशबू पाटनीने संताप व्यक्त केला आहे. हुंड्याची बळी ठरलेल्या प्रत्येक मुलीची बातमी मागे एकच प्रश्न सोडून जाते तो म्हणजे, "खरंच लग्न करणं इतकं गरजेचं आहे का?" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
20 May, 26 : 01:44 PM
गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
छगन भुजबळ म्हणाले, केरोसीनचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. जिथे जिथे अडचण येत आहे तिथे अधिकारी काम करत आहेत. केरोसीन विकणारी साखळी तुटली आहे, त्या व्यवसायाचे लोक इतर व्यवसायात गेले आहेत. ज्यांना परवाना हवा आहे त्यांना आम्ही परवाना देणार आहे. भारत सरकारने जर काही नियमावली काढली तर आम्ही ती पाठवू. पीएनजी गॅसची पाईप गेली आहे, तिथे ३० जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. पाईपलाईन असूनही तिथे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमचा सिलेंडर बंद होणार आहे. ३० जूनच्या आधी तो अर्ज करा.
20 May, 26 : 01:31 PM
'राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा'
राज्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल -डिझेल संपल्याचे सांगण्यात येत आहे, याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. राज्यात एक महिन्याचा साठा असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर इंधनाचा तुटवडा हा जागतिक प्रश्न असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
20 May, 26 : 01:21 PM
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण सातत्याने गुंतागुंतीचं होत चाललं आहे. याच दरम्यान या प्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजने तपासाला एक नवी दिशा दिली असून अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. फुटेजमध्ये ट्विशा शर्मा इमारतीच्या पायऱ्यांवरून गच्चीवर जाताना दिसत आहे. यानंतर साधारण एका तासाने तिचा पती समर्थ आणि इतर तीन लोक तिला खाली घेऊन येताना दिसत आहेत. वाचा सविस्तर
20 May, 26 : 12:44 PM
पुण्यात पुन्हा गॅंगवॉर; दिवसाढवळ्या गोळीबाराची थरारक घटना, अक्षय मस्केवर ५ गोळ्या झाडल्या
पुणे: पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे-सातारा रस्त्यावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळा मस्के (वय २६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर..!
20 May, 26 : 12:05 PM
पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द, शहराच्या विकासाच्या 34 विषयांची मंजुरी पडली लांबणीवर
पंढरपूर नगरपालिकेचे सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी २० मे रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली होती. या सभेसाठी अजेंड्यावर 34 विषय ठेवण्यात आले होते. पायाभूत सुविधांवर असणारे अनेक विषयांना या सभेमध्ये मंजुरी दिली जाऊ शकत होती. तसेच काही विषयावर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक देखील आमने-सामने येण्याची दाट शक्यता होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आचारसंहितेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.
20 May, 26 : 11:25 AM
धुळे जिल्ह्यातील १८०० औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे आज बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये धुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे १८०० औषध विक्रेते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली आहे.
20 May, 26 : 11:24 AM
इस्रायलचा लेबनानवर हवाई हल्ला, १९ लोक ठार; तीन लहान मुलं आणि महिलांचा समावेश
इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण लेबनानमध्ये इस्रायलने हल्ले केले, त्यात १० लोक एकाच हल्ल्यात मरण पावले आहेत, अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
एका घरावरच हवाई हल्ला करण्यात आला. त्यात तीन लहान मुलांसह तीन महिलांचाही मृत्यू झाला. लेबनानने २ मार्च रोजी युद्धात उडी घेतली होती. पण, गेल्या आठवड्यातच शस्त्रसंधी झाली. त्यानंतर आता इस्रायलने पुन्हा हल्ला केला आहे.
20 May, 26 : 11:19 AM
१५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप
भारतातील औषध विक्रेत्यांनी आज संप पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील १५ लाखांपेक्षा औषधी दुकाने बंद आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट (AIOCD) संघटनेने बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज (२० मे) देशभरातील मेडिकल दुकाने बंद आहेत.
केंद्र सरकारने जीएसआर २२० (ई) आणि जीएसआर ८१७ (ई) या दोन्ही अधिसूचना रद्द करण्यात याव्यात अशी मागणी संघटनेची आहे. या तरतुदींचा आधार घेऊन ऑनलाईन फॉर्मसी कंपन्या चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत.
20 May, 26 : 10:52 AM
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. तसेच गावागावांत सुरू असलेल्या बैठका 23 तारखेपर्यंत स्थगित केल्याची माहिती जरांगे यांनी दिली. जरांगे यांनी 30 मे रोजी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू, असे प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
20 May, 26 : 10:48 AM
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले
जपानच्या दक्षिणेकडील कागोशिमा भागात आज ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा एक अतिशय शक्तिशाली भूकंप झाला. या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांमुळे संपूर्ण भागातील मोठ्या इमारती आणि घरे जोरात हादरली. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेसाठी अनेकांनी मोकळ्या जागेकडे धाव घेतली. (सविस्तर वाचा)
20 May, 26 : 10:33 AM
इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत आहे. हे युद्ध काही काळासाठी थांबवल्यानंतर अवघ्या एका दिवसात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हल्ल्यासाठी नवीन संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. 'इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करू शकतात', असे ट्रम्प म्हणाले. (सविस्तर वाचा)
20 May, 26 : 10:32 AM
४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
काही दिवसापूर्वी मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता, आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. (सविस्तर वाचा)