"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 14:13 IST2026-05-20T14:05:21+5:302026-05-20T14:13:50+5:30
राजकीय मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकत्र येण्याचे शरद पवारांचे आवाहन; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचेच कान टोचले

"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
CM Devendra Fadnavis on Sharad Pawar: "राजकीय विचारसरणी आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी देशहिताच्या मुद्द्यावर कधीही राजकारण आणता कामा नये," अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे आणि देशाची प्रतिष्ठा जपण्याचेच काम करत आहेत, अशा शब्दांत पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे.
मंगळवारी मुंबईत आयोजित लक्ष्मणराव गुट्टे ग्रामीण विकास संस्थेच्या एका विशेष सन्मान सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि नेतृत्वावर भाष्य केले. "आज आपला देश एका नव्या आणि वेगळ्या वळणावर उभा आहे. आमचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय दृष्टिकोन नक्कीच भिन्न असू शकतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ते भारताची प्रतिमा अधिक मजबूत करत आहेत, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. जेव्हा देशाच्या अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत," असं शरद पवार म्हणाले.
पवारांनी पुढे बोलताना देशाच्या माजी पंतप्रधानांचा दाखला दिला. इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांसारख्या महान नेत्यांनी नेहमीच देशाचे हित आणि जागतिक पातळीवरील भारताचे स्थान केंद्रस्थानी ठेवले होते. आज पंतप्रधान मोदी देखील त्याच मार्गाने देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करत असल्याचे पवारांनी नमूद केले. समाजात काम करताना पक्षाच्या भिंती ओलांडून जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांकडून पवारांच्या विधानाचे स्वागत; विरोधकांना टोला
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून आलेली ही प्रतिक्रिया अत्यंत परिपक्व आणि महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"शरद पवार यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे. ज्यावेळी अनेक लोक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात का गेले, तिकडे काय होतंय अशी टीका करत होते. त्यावेळी ज्या प्रकारचे महत्त्वाचे करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने केले आहेत. पुढल्या २० वर्षांचे आपले भवितव्य हे या करारांमुळे सुरक्षित झालं आहे. म्हणूनच शरद पवार यांनी सांगितले की, विनाकारण टीका करु नका. पंतप्रधान परदेशात जाऊन देशाच्या हिताचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.