Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:24 IST2026-05-20T12:23:03+5:302026-05-20T12:24:32+5:30
भोपाळच्या चर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आता तिची वहिनी राशि शर्मा हिने समोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत.

Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
भोपाळमधील गाजलेल्या हायप्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील वाद आता आणखीच पेटला आहे. या प्रकरणात आता ट्विशाची वहिनी राशि शर्मा हिने जाहीरपणे समोर येत सासरच्यांवर आणि संपूर्ण पोलीस प्रशासनावर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. "माझ्या नणंदेचा सासरच्यांकडून दीर्घकाळापासून मानसिक छळ केला जात होता आणि आता तिच्या मृत्यूनंतरही तिची बदनामी केली जात आहे," असा थेट आरोप राशिने केला. इतकेच नाही तर, कोर्ट परिसरात ट्विशाच्या भावाला जाहीरपणे जीवे मारण्याची आणि "३० लोक बोलावून मारहाण करीन, तू मला ओळखत नाहीस," अशी धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासाही तिने केला आहे. सासरच्या लोकांचे वजन आणि राजकीय वलय पाहता या प्रकरणाचा तपास आता सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
राशि शर्माने म्हटले की, ट्विशाच्या मृत्यूनंतर पहिले सात दिवस सासरच्यांनी कोणतीही सहानुभूती दाखवली नाही किंवा न्यायाची मागणी केली नाही. मात्र, जसा मुख्य आरोपी पती समर्थ सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला, तसे सासरच्यांनी मीडियासमोर खोटे अश्रू ढाळण्यास सुरुवात केली.
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ड्रग्जचा दावा फेटाळला; तरीही सासूकडून बदनामी सुरू!
ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी ट्विशाला ड्रग्जचे व्यसन होते आणि ती मानसिक रुग्ण होती, असा दावा केला होता. मात्र, वहिनी राशिने या दाव्याचा पुरता फज्जा उडवला आहे. राशिने सांगितले की, "ट्विशाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून, तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे अंश मिळालेले नाहीत. हे लॅब रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे."
तरीही केवळ स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी माजी न्यायाधीश असणाऱ्या सासूकडून मृत सुनेवर चिखलफेक केली जात आहे. जर एखाद्या सुशिक्षित महिलेला घरात कोंडून सतत छळले गेले आणि नंतर तिच्यावरच वेडेपणाचे आरोप केले गेले, तर हा मानसिक आजार नसून सासरच्यांचा दुटप्पीपणा आहे, असे राशिने सुनावले. तसेच, माजी जज असल्यानेच गिरीबाला सिंग यांना वयाच्या आधारावर जामीन मिळाला, मात्र त्या बाहेर येऊन तपासात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही तिने केला.
"पती क्रिमिनल लॉयर, आई माजी जज; म्हणूनच तात्काळ पोलीस बोलावले नाहीत"
तपासातील मोठ्या त्रुटींवर बोट ठेवताना राशिने सांगितले की, हे स्पष्टपणे 'मेडिकल-लीगल' प्रकरण असतानाही मुख्य आरोपी पती समर्थ सिंग याला ताब्यात घेऊन त्याची कडक चौकशी का करण्यात आली नाही? सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत ती म्हणाली की, "सासरचे लोक ट्विशाला सीपीआर देत असल्याचा खोटा दावा करत आहेत, कारण व्हिडिओमध्ये घरातील लोक अगदी सामान्यपणे इकडेतिकडे फिरताना दिसत आहेत. जर काही अघटित घडले होते, तर त्यांनी पोलिसांना तात्काळ फोन का केला नाही?"
विशेष म्हणजे, पीडित कुटुंबाची एफआयआर नोंदवून घेण्यासाठी भोपाळ पोलिसांनी तब्बल ३ दिवस लावले. सासरचे कुटुंब स्वतः न्यायव्यवस्थेशी जोडलेले आहे, मुलगा स्वतः गुन्हेगारी प्रकरणांचा वकील आहे आणि आई निवृत्त न्यायाधीश आहे, यामुळेच पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ट्विशा परत येणार होती, तिकीटही बुक झाले होते!
ट्विशा आणि आपल्यातील संबंधांबद्दल बोलताना राशि भावुक झाली. तिने सांगितले की, ट्विशाने अनेकदा फोनवर आणि मेसेजमध्ये आपल्यासोबत होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता. तिला तिथून पळून आपल्या माहेरी परत यायचे होते. तिने घरच्यांना फोन करून तिकीट बुक करण्यास आणि पैसे पाठवण्यास सांगितले होते. कुटुंबाने तिचे तिकीटही बुक केले होते, मात्र सासरच्यांनी दबाव आणून ते तिकीट रद्द करायला लावले. नोकरी गेल्यापासून पती समर्थ हिंसक झाला होता आणि तो सतत ट्विशाला शिवीगाळ करून तिचा छळ करायचा.
मुख्यमंत्र्यांनी ५ मिनिटेही दिली नाहीत; कोर्टात भावाला धमकी!
न्यायासाठी भटकणाऱ्या या कुटुंबाला मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेटही नाकारण्यात आल्याचा आरोप राशिने केला आहे. "आम्ही मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे फक्त ५ मिनिटांचा वेळ मागत होतो, पण तोही मिळाला नाही. उलट पोलीस आम्हालाच त्रास देत आहेत," असे तिने सांगितले.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, कोर्ट परिसरात तपास प्रक्रियेदरम्यान आरोपींच्या पाठीराख्यांनी ट्विशाच्या भावाला धक्का दिला, त्याचा फोन फेकून दिला आणि उघडपणे "३० लोक बोलावून तुला चोपून काढीन, तू मला ओळखत नाहीस," अशी धमकी दिली. यावरून पीडित कुटुंब सध्या किती दबावात आणि भीतीखाली जगत आहे, हे सिद्ध होते. आता या प्रकरणात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून ट्विशाला न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.