Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:02 IST2026-05-20T10:55:32+5:302026-05-20T12:02:44+5:30
Giorgia Meloni Life Story : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या जीवनाचा संपूर्ण संघर्ष. आईचा गर्भपाताचा निर्णय बदलण्यापासून ते थेट पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास.

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सेल्फी असो, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सौंदर्याचे केलेले कौतुक असो किंवा अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी चक्क गुडघ्यावर बसून केलेले त्यांचे स्वागत असो... इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जेव्हा कधी एखाद्या जागतिक नेत्याला भेटतात, तो क्षण सोशल मीडियावर 'व्हायरल ट्रेंड' बनतो. परंतु, मेलोनी यांची खरी कहाणी या व्हायरल रील्स आणि फोटोंपेक्षा कितीतरी पटीने जास्त संघर्षमय आणि थक्क करणारी आहे.

एका नाईट क्लबमध्ये बारटेंडर म्हणून काम करणारी मुलगी इटलीच्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर कशी पोहोचली?

बालपणातील संघर्ष
जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म १५ जानेवारी १९७७ रोजी रोममध्ये झाला. त्यांचे वडील फ्रान्सिस्को हे टॅक्स सल्लागार होते आणि आई अण्णा या कादंबरीकार होत्या. मेलोनी यांनी आपल्या 'इओ सोनो जॉर्जिया' (मी जॉर्जिया आहे) या आत्मचरित्रात एक धक्कादायक खुलासा केला आहे.

आईची ती हिंमत: मेलोनी लिहितात, "मी गर्भात असताना माझ्या आईने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी ती क्लिनिकमधून मागे फिरली. आईच्या त्या धाडसामुळेच आज माझा जन्म झाला आहे."

घराला लागलेली आग
मेलोनी अवघ्या एक वर्षाच्या असताना त्यांचे वडील कुटुंबाला सोडून स्पेनला निघून गेले आणि त्यांनी दुसरे लग्न केले. त्यानंतर मेलोनी ३ वर्षांच्या असताना त्यांच्या आणि त्यांच्या बहिणीच्या एका चुकीमुळे घराला भीषण आग लागली. सर्व काही खाक झाल्यामुळे मेलोनी यांच्या कुटुंबाला रस्त्यावर यावे लागले आणि कित्येक दिवस आजोबांच्या घरी जमिनीवर गादी टाकून राहावे लागले.

पैशांअभावी कॉलेज सुटले; नाईट क्लबमध्ये बारटेंडर बनल्या
गरिबीमुळे जॉर्जिया मेलोनी यांना कॉलेजचे शिक्षण घेता आले नाही. घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी सीडी विकल्या, लहान मुलांची काळजी घेण्याचे काम केले आणि रोममधील प्रसिद्ध 'पायपर क्लब'मध्ये बारटेंडर म्हणून नोकरी केली. मेलोनी अभिमानाने सांगतात, "मी जीवनाचे खरे धडे देशाच्या संसदेत नाही, तर बार काउंटरच्या मागे उभे राहून शिकले आहे."

विचारधारा आणि वाद: मुसोलिनीची स्तुती
वयाच्या १५ व्या वर्षी राजकारणात आलेल्या मेलोनी यांच्यावर सुरुवातीला हुकूमशहा मुसोलिनीचे समर्थक असल्याचा आरोप झाला होता. १९९६ मधील एका मुलाखतीत त्यांनी मुसोलिनीला 'एक चांगला नेता' म्हटले होते, ज्यावरून मोठा वाद झाला होता. तथापि, नंतर त्यांनी आपला पक्ष पारंपारिक राष्ट्रवाद आणि कॅथोलिक ख्रिश्चन मूल्यांकडे वळवला. त्या महिलांसाठीच्या विशेष आरक्षणाचा विरोध करतात आणि स्वतःला पारंपारिक स्त्रीवादी मानत नाहीत.

वैयक्तिक आयुष्य: ८ वर्षांचे लिव्ह-इन आणि अचानक ब्रेकअप
मेलोनी यांचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. २०१४ मध्ये एका टीव्ही शो दरम्यान त्यांची भेट टीव्ही पत्रकार अँड्रिया जियाम्ब्रुनो यांच्याशी झाली. दोघे ८ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्यांना 'जिनेवरा' नावाची एक मुलगी आहे. मात्र, २० ऑक्टोबर २०२३ रोजी मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत अँड्रियासोबतचे आपले १० वर्षांचे नाते संपवल्याचे जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला होता.

सर्वसामान्यांसारखा अंदाज हीच सर्वात मोठी ताकद
मेलोनी यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सामान्य जनतेशी जोडलेली भाषा आणि चुलबुला स्वभाव. २०१९ मधील एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या, "मी जॉर्जिया आहे, मी एक महिला आहे, मी एक आई आहे आणि मी ख्रिश्चन आहे!" त्यांचे हे वाक्य इटलीमध्ये प्रचंड गाजले. २०२४ च्या 'G7' शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसमोर त्यांनी केलेला पारंपरिक इटालियन डान्स 'पिजिका' हेच दर्शवतो की, त्या अत्यंत दिलखुलास नेत्या आहेत.

















