राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत
By सुनील चरपे | Updated: May 20, 2026 09:46 IST2026-05-20T09:45:54+5:302026-05-20T09:46:58+5:30
Petrol, Diesel Shortage: तांत्रिक कारणांमुळे इंधन पुरवठा कमी : ऐन वेळी बैलजोडी कुठून आणायची? खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे ठप्प झाल्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका, मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये पुरवठा सुरळीत, सांगलीत रेशनिंग पद्धतीचा अवलंब

राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत
- सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण भागातील पंपांना डिझेलचा पुरवठा कमी केला जात असल्याने ट्रॅक्टर मालकांना पुरेसे डिझेल मिळेनासे झाले आहे. सध्या पेट्राेल पंपांवर मिळणाऱ्या डिझेलमध्ये तीन ते चार तास मशागतीची काम करणे शक्य असल्याचे ट्रॅक्टर मालकांनी सांगितले. परिणामी, पावसाळा ताेंडावर असताना डिझेलअभावी शेतातील खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांवरील संकट गडद हाेत चालल्याचे चित्र आहे.
एक बैलजाेडी पाेसायला वर्षाकाठी किमान १.३५ लाख रुपये खर्च येताे तसेच बैलजाेडीचे कामाचे दिवस खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना बैलजाेडी पाेसायला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या मदतीने शेतीची कामे करवून घेतात. ग्रामीण भागातील पेट्राेल पंपमालकांनी ट्रॅक्टर मालकांना ११ मेपासून राेज १० ते १५ लिटरपेक्षा अधिक डिझेल देणे बंद केले आहे. त्यामुळे मिळणाऱ्या या डिझेलमध्ये तीन ते चार तास नांगरटी किंवा वखरणी करणेे शक्य हाेत असून, उर्वरित २० ते २१ तास ट्रॅक्टर काम बंद करून केवळ उभा करून ठेवावा लागत आहे.
पूर्वी पेट्राेल पंपवर डबकीमध्ये (कॅन) डिझेल दिले जायचे. त्यामुळे शेतात ट्रॅक्टर सुरू असताना कुणीतरी पेट्राेलपंपवर जावून डिझेल खरेदी करून शेतात आणत असल्याने शेतातील कामे थांबत नव्हती. आता पंपमालकांनी डबकीमध्ये देणे बंद केल्याने मालकाला शेतातील कामे साेडून ट्रॅक्टर घेऊन पंपावर जावे लागत असल्याने त्यांचे किमान तीन ते पाच तास वाया जात असल्याचे ट्रॅक्टर मालकांनी सांगितले.
क्रेडिट पॉलिसी बंद
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेट्राेलियम कंपन्या पेट्राेल पंपमालकांना तीन ते पाच दिवस उधारीत पेट्राेल व डिझेल द्यायचे. मात्र, २१ मार्च २०२६ पासून कंपन्यांनी ही क्रेडिट पॉलिसी बंद करून ॲडव्हान्स पेमेंट सक्तीचे केले आहे. त्यामुळे बहुतांश पेट्राेल पंपमालक पेट्राेलच्या तुलनेत डिझेल कमी मागवत आहेत, अशी माहिती या व्यवसायातील जाणकार व्यक्तींनी दिली.
गडचिरोली : पंपावर इंधन संपल्याचे फलक मालवाहतूक व्यावसायिकांची धावपळ
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून, अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र १९ मे राेजी मंगळवारी शहरी भागात दिसून आले. इंधनाचा पुरवठा अपुरा होत असल्याने नागरिक, ट्रॅक्टर चालक, मालवाहतूक व्यावसायिक तसेच सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिझेल टंचाईमुळे मालवाहतूक व्यावसायिकांची धावपळ वाढली आहे.
तालुकास्तरावरील व ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने उन्हाळी हंगामातील शेतीकामे, बांधकामे तसेच मालवाहतूक सेवा विस्कळीत होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
३० टक्के पंपांवर “नो डिझेल, नाे पेट्राेल” चे फलक : गडचिराेली जिल्ह्यात एकूण ५० पेट्रोलपंप असून शहरातील पंपाची संख्या ९ आहे. यापैकी १९ मे राेजी साेमवारला २५ ते ३० टक्के पेट्रोल पंपांवर “नो डिझेल, नाे पेट्राेल” असे फलक लावण्यात आल्याचे दिसून आले.
सांगली : मागणीनुसार पुरवठा नाही, ४-५ दिवसांपासून पंपावर लांबच लांब रांगा
सांगली : जिल्हाभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी मंगळवारी पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. काही पंपांवर इंधनसाठा संपुष्टात आला असून अनेक पंपांवर जेमतेम साठा आहे. सांगली-मिरजेतील पंपांवर गेल्या चार दिवसांपासून दररोज वाहनचालकांची गर्दी होत आहे. तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेसा पुरवठा होत नसल्याचे पंपचालकांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील सर्रास पंप सोमवारी बंद होते.
२०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्री नाही
तेल कंपन्यांनी डिझेलच्या विक्रीवर नियंत्रण लावले आहे. २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्री होत असल्यास पंप आपोआपच लॉक केला जात आहे. त्यामुळे टॅक्टरसह मालवाहू वाहनांना पुरेसे इंधन मिळत नसल्याने याचा फटका शेतातील उन्हाळी कामांना बसत आहे.
कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग शहरात पुरवठा सुरळीत सुरू होता. काही पंपावर ठराविक रकमेचेच पेट्रोल- डिझेल दिले जात होते.
नाशकातही टंचाईचे सावट
नाशिक : शहरात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पेट्रोलपंपांवरील परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी दिसून येत आहे. शहरातील त्र्यंबकरोड, वडाळारोड, पंचवटी, सातपूर, सिडको आदी भागांतील अनेक पेट्रोलपंपांवर मंगळवारी (दि.१९)ही डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसल्या. काही पेट्रोलपंपांवर ‘डिझेल उपलब्ध नाही’, अशा पाट्या लावण्यात आल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
८० दिवसांपासून हाल बेहाल
छत्रपती संभाजीनगर : शहर व जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक' चे फलक झळकत असल्यामुळे नागरिकांचे ८० दिवसांपासून हाल होत आहेत. पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा सध्या दिसत आहेत. शहर व ग्रामीण भागात एका दिवसांत ६ लाख ४८ हजार पेट्रोल तर ११ लाख ४८ हजार लिटर डिझेलची विक्री शहर व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर झाली.
अकोला : टंचाईच्या चर्चेने साठवणूक, अनेक पंप बंद
शहरासह पातूर परिसरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वाहनांमध्ये इंधन भरण्यासोबतच अनेकजण प्लास्टिक कॅन, ड्रम व इतर कंटेनरमध्ये डिझेल साठवून ठेवत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. तर जिल्ह्यातील अनेक पंपांवरील साठा संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
वाशिम : डिझेलसाठी सकाळपासून रांगा, मालवाहू वाहनांना फटका
शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या तयारीमुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला असून, डिझेलअभावी शेती मशागतीची कामे प्रभावित होत आहेत. डिझेल मिळवण्यासाठी अनेक शेतकरी सकाळपासून पेट्रोल पंपांवर रांगा लावत असून, काही ठिकाणी कॅन ठेवून क्रमांक लावले जात आहेत. ट्रॅक्टर, मालवाहू वाहनधारकांना या परिस्थितीचा फटका बसत आहे.
बुलढाणा : डिझेल पुरवठ्यावर मर्यादा, बाजार समित्यांना फटका
जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यासह काही भागांत ट्रॅक्टरला मर्यादित डिझेल दिले जात असल्याने ग्रामीण भागात अस्वस्थता वाढत आहे. अनेक पंपांवर वाहनधारकांना केवळ एक ते दोन हजार रुपयांपर्यंतच डिझेल दिले जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, मालवाहतूक आणि कृषी यंत्रसामग्रीच्या कामांवर परिणाम होत आहे. बाजार समित्यांतील आवक-जावक व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे.