५वा महिना, ५ ग्रह गोचर, ५ राजयोग: १० राशींना अकल्पनीय लाभ, पद-पैसा वाढ; काही कमी पडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 07:07 IST2026-04-29T07:07:07+5:302026-04-29T07:07:07+5:30
May Month Astrology Prediction 2026: मे महिन्याला सुरुवात होत असून, अनेक ग्रह गोचर करणार आहेत. या ग्रहांच्या युतीने अत्यंत शुभ, चांगला लाभ देणारे राजयोग जुळून येत आहेत. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

May Month Astrology Prediction 2026: सन २०२६ चा पाचवा महिना म्हणजेच मे महिना सुरू होत आहे. ११ मे रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. स्वराशीत प्रवेश केल्याने मंगळाचे गोचर विशेष मानले जात आहे. तसेच १४ मे रोजी बुध ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी म्हणजेच १४ मे रोजी शुक्र स्वराशीतून म्हणजेच वृषभ राशीतून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

May Month Astrology 2026: नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह १५ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर वृषभ संक्रांती सुरू होईल. सूर्य आणि बुधाच्या गोचराने बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तर २९ मे रोजी बुध पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून मिथुन राशीत प्रवेश करेल. तेथे त्यांची युती शुक्र आणि गुरू या ग्रहांशी होईल.

Astrology Prediction Of May Month 2026: बुधादित्य राजयोगासह गजकेसरी राजयोग, गजलक्ष्मी राजयोग, रुचक राजयोग, मालव्य राजयोग, लाभ दृष्टी योग, लक्ष्मी नारायण राजयोग, असे अनेक राजयोग जुळून येणार आहेत. हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहील? जाणून घेऊया...

मेष: संमिश्र काळ असेल. वैयक्तिक आयुष्य चांगले राहील. परंतु करिअरमध्ये आव्हाने निर्माण होऊ शकतात. ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढू शकेल. जुनी भीती आणि अनिश्चितता हळूहळू दूर होतील. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा वाढेल. करिअरमध्ये हळूहळू प्रगती होईल. नोकरी किंवा नवीन करिअरच्या शोधात असलेल्यांसाठी संधी निर्माण होतील. परंतु, रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल.

वृषभ: अत्यंत शुभ काळ आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. कार्यक्षमता सुधारेल. कर्तव्ये अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. निर्णय घेण्याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. जे ऑनलाइन किंवा परदेशात काम करू इच्छितात त्यांच्यासाठी करिअरचे नवीन मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु खर्चही वाढू शकतो. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

मिथुन: प्रेम, रोमांस आणि सुख-सोयींमध्ये वाढ अनुभवायला मिळेल. बुध ग्रहामुळे काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो, परंतु गुरू आणि शुक्र ग्रहांचा प्रभाव सकारात्मक परिणाम देईल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ असून, ते अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतात. धार्मिक किंवा प्रवासाशी संबंधित कामांसाठी खर्च वाढू शकतो. परंतु यामुळे अनुभव मिळू शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कर्क: शानदार काळ असेल. करिअरमध्ये प्रगती, परदेशातून संधी आणि सामाजिक आदर वाढणे अपेक्षित आहे. जुन्या समस्या कमी होतील, आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील, उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यताही आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

सिंह: अचानक आर्थिक लाभ, मोठे यश मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या संधी मिळतील. सामाजिक आदर वाढेल आणि आत्मविश्वास दृढ होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, मात्र काही खर्च वाढू शकतात. घरात किरकोळ बदल किंवा दुरुस्ती करणे आवश्यक असू शकते.

कन्या: काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. चांगली बातमी मिळू शकते. कामाची प्रगती मंद राहील, नोकरी करणाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. गुरू-शुक्र युतीने काहीसा दिलासा मिळेल, अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. बचतीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे आणि अनपेक्षित आर्थिक लाभाची शक्यता असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली असू शकते. गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, तर सावधगिरीने पुढे जाणे उत्तम राहील. काही लोक प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु परिस्थिती हाताळू शकाल.

तूळ: हा काळ फायदेशीर असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील, प्रतिष्ठा वाढेल. नवीन बदल दिसू शकतील. कालांतराने ऊर्जा आणि उत्साह वाढेल. प्रवास, विशेषतः धार्मिक यात्रा शक्य होतील. गुरूंकडून मार्गदर्शन मिळेल. शिक्षण घेत आहेत, त्यांना हा काळ अनुकूल असेल. चांगल्या संधी मिळू शकतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. भागीदारी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीही मिळतील.

वृश्चिक: संपत्तीचा फायदा होऊ शकतो, परंतु गुप्त शत्रूंपासून सावध राहा. मंगळाची स्थिती त्यांना सामर्थ्य देईल. शत्रूंवर आणि समस्यांवर नियंत्रण ठेवू शकतील. उत्पन्न आणि खर्च दोन्ही स्थिर राहतील, म्हणजेच पैशांची आवक-जावक सुरू राहील. प्रवास शक्य आहे आणि त्यामुळे खर्च वाढू शकतो. आरोग्याबाबत आणि वाहनाबाबत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात काही तणाव किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. कालांतराने परिस्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल.

धनु: हा काळ खूप अनुकूल असू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. प्रवासाच्या संधी निर्माण होतील. शिक्षणातही यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मुलांबाबत काही चिंता असू शकते. वैयक्तिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भागीदारीमध्ये किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात. परिस्थिती नियंत्रणात राहील. आरोग्याबाबत सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात.

मकर: करिअरमध्ये प्रगती, प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा आणि मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी होण्याची शक्यता आहे. हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. हट्टीपणा किंवा राग टाळणे महत्त्वाचे आहे. यामुळे नातेसंबंधांवर ताण येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ असेल. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात, परंतु, कालांतराने परिस्थितीत सुधारणा होईल.

कुंभ: आर्थिक बळकटी, नवीन संधी मिळू शकतील. नवीन नोकरी किंवा शिक्षणासाठी सकारात्मक संधी मिळू शकतात. सर्जनशीलता वाढेल. कौशल्यांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकाल. आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मानसिक चिंता किंवा दुःख कायम राहू शकते, तरी वाढलेला आत्मविश्वास यावर मात करण्यास मदत करेल.

मीन: करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. परंतु, प्रेमात संयम आणि समजूतदारपणाची गरज भासेल. घरात शुभ घटना घडू शकतात. वैयक्तिक खर्च वाढू शकतो. कुटुंबाकडून पाठिंबा आणि पालकांकडून मार्गदर्शन मिळेल. खर्चासोबतच बचत करणेही शक्य होईल. आरोग्याकडेविशेष लक्ष देणे आवश्यक असेल. शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. एकाग्रता वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















