आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:03 IST2026-04-29T15:01:37+5:302026-04-29T15:03:49+5:30
'एसडीएम मॅडम' लोकांमध्ये 'मॅडम कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध झाली. यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

फोटो - आजतक
बरेलीच्या गल्लीबोळातून आलेल्या एका मुलीने असं स्वप्न पाहिलं, जे देशातील लाखो तरुणांच्या डोळ्यांत असतं. आयएएस (IAS) होण्याचं स्वप्न, ज्यासाठी लोक आपलं आयुष्य पणाला लावतात. तिनेही तेच केलं. आठ वर्ष पुस्तकं, नोट्स, कोचिंग आणि मॉक टेस्टमध्ये घालवली, पण यश मिळालं नाही. जेव्हा ती UPSC परीक्षेत यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने स्वतःसाठीच एक नवी ओळख निर्माण केली. तिने 'एसडीएम' (SDM) असल्याचं खोटं सांगायला सुरुवात केली. हळूहळू ही 'एसडीएम मॅडम' लोकांमध्ये 'मॅडम कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध झाली. यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महागडी लक्झरी SUV, व्हीआयपी स्टाईल, सरकारी अधिकाऱ्यांसारखं वागणं आणि प्रचंड आत्मविश्वासाने ती फिरू लागली. तिची एन्ट्री एखाद्या फिल्मी सीनपेक्षा कमी नसायची. SUV थांबायची, दरवाजा उघडायचा आणि 'मॅडम' बाहेर पडायच्या. आसपासचे लोक आदराने उभे राहायचे. काही जण सलाम करायचे, तर काही जण रस्ता मोकळा करून द्यायचे. लोक प्रश्न न विचारता तिच्यावर विश्वास ठेवू लागले. समोर बसलेल्या महिलेकडे ताकद आहे, पोहोच आहे आणि यंत्रणा चालवण्याची क्षमता आहे, असं प्रत्येकाला वाटायचं.
लोकांमध्ये निर्माण केला दरारा
हळूहळू तिच्या बँक खात्यात रक्कम वाढत गेली. तिने आपल्या ज्ञानाचा वापर एक खोटी ओळख निर्माण करण्यासाठी केला. बरेलीच्या बारादरी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रीन पार्क कॉलनीतील राहणाऱ्या विप्रा हिची ही गोष्ट आहे. विप्राने २०१२ ते २०२० या काळात नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. UPSC मध्ये अपयश आल्यावर, विप्राने स्वतःला आधी एसडीएम आणि नंतर गजरौला येथे तैनात असलेली एडीएम (ADM - FR) सांगून लोकांमध्ये दरारा निर्माण केला.
सरकारी नोकरी लावण्याचं आमिष
विप्राची पद्धत अत्यंत चलाख होती. ती आधी तरुणांशी मैत्री करायची, मग त्यांना सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवायची. तिच्या बोलण्याने आणि अधिकारी थाटाने प्रभावित होऊन अनेक लोक तिच्या जाळ्यात अडकले. नोकरीच्या आशेने त्यांनी लाखो रुपये तिला दिले. यासाठी विप्राने पूर्ण यंत्रणा तयार केली होती. नियुक्ती पत्रं आणि इतर सरकारी कागदपत्रं लखनौमधील सरकारी कार्यालयांजवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमधून कुरिअर केली जात असत. यामुळे पीडितांना खात्री पटायची की, आपली कागदपत्रे खरोखरच सरकारी विभागातून आली आहेत.
५ लाख २१ हजार रुपये उकळले
विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तिने एका पीडिताच्या खात्यात १७ हजार रुपये 'पगार' म्हणून ट्रान्सफरही केले. त्यानंतर त्या तरुणाचा पूर्ण विश्वास बसला की आपल्याला नोकरी मिळाली आहे आणि पगारही सुरू झाला आहे. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा किला परिसरातील मुसाहिद नावाच्या तरुणाने तक्रार दाखल केली. मुसाहिदकडून कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली ५ लाख २१ हजार रुपये उकळण्यात आले होते. बराच काळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने त्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
खात्यांमध्ये ५५ लाख सापडले
या कारवाईत पोलिसांनी विप्रा, शिखा आणि दीक्षा यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लक्झरी कार जप्त करण्यात आली आहे, ज्यावर 'ADM' लिहिलं होतं. याशिवाय १० पेक्षा जास्त चेकबुक, दोन लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि विविध बँक खात्यांमध्ये जमा असलेले सुमारे ५५ लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांनी ही सर्व खाती फ्रीज केली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.