कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:38 IST2026-04-28T15:37:56+5:302026-04-28T15:38:47+5:30
AI Maintenance cost 2026 : एआय मॉडेल्स चालवण्याचा खर्च वेगाने वाढत आहे. २०२६ मध्ये जागतिक आयटी खर्च ६.३१ ट्रिलियन डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. उबेरसारख्या कंपन्यांचे बजेट काही महिन्यांतच संपले असून सामान्य युजर्सनाही जादा पैसे मोजावे लागत आहेत.

कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ...
अनेक आघाडीच्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून एआयवर पैसा लावत आहेत. परंतू, एआयने हळूहळू आता रंग दाखवायला सुरुवात केली असून कर्मचारी परवडले पण एआय नको असे म्हणायची वेळ या कंपन्यांवर आली आहे.
एआय मॉडेल ट्रेन करणे आणि ते चालवणे आता इतके महाग झाले आहे की, अनेक कंपन्यांचे एआय बिल त्यांच्या मनुष्यबळाच्या खर्चाला मागे टाकत आहे. गार्टनरच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये जागतिक आयटी खर्च ६.३१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचू शकतो, जो २०२५ च्या तुलनेत १३.५% जास्त आहे. उबेरचे प्रवीण नेपल्ली नागा यांनी उघड केले की, त्यांच्या कंपनीने २०२६ चे संपूर्ण एआय बजेट केवळ काही महिन्यांतच खर्च केले आहे. यासाठी Claude Code सारख्या कोडिंग टूल्सचा अतिवापर कारणीभूत ठरला.
महागडे बिल
अमोस बार-जोसेफ यांनी सांगितले की, त्यांच्या केवळ ४ लोकांच्या टीमसाठी एआयचे एका महिन्याचे बिल १,१३,००० डॉलर्स (सुमारे १.०६ कोटी रुपये) इतके आले आहे. एनव्हिडियाचे व्हीपी ब्रायन कॅटानझारो यांच्या मते, त्यांच्या टीमसाठी कॉम्प्युटिंगचा खर्च आता कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा जास्त झाला आहे.
सामान्य युजर्सवर होणारा परिणाम
एआयच्या वाढत्या खर्चाचा फटका आता सर्वसामान्यांनाही बसत आहे. अँथ्रोपिकच्या युजर्सनी तक्रार केली आहे की त्यांच्या टोकन मर्यादा लवकर संपत आहेत, ज्यामुळे त्यांना पूर्ण फायदा घेता येत नाही. एक नवीन 'एआय क्लास' तयार होत आहे, जिथे श्रीमंत युजर्स Claude सारखी प्रगत टूल्स वापरत आहेत, तर कमी उत्पन्न गट Meta AI सारख्या मोफत आणि बेसिक टूल्सवर अवलंबून आहेत.
खर्च कमी करण्यासाठी टेक दिग्गज कंपन्या प्रयत्नशील आहेत. गुगलने नवीन Tensor Processing Units (TPU) लाँच केले आहेत, जे कमी वीज वापरून जास्त कार्यक्षमता देतात. तर ओपनएआयने आपले नवीन मॉडेल GPT-5.5 लाँच केले असून, ते कमी टोकन्समध्ये अधिक काम करते, ज्यामुळे भविष्यात खर्च कमी होण्याची शक्यता आहे.