Nitin Gadkari on Petrol-Diesel: देशातील पारंपरिक इंधनावर(पेट्रोल-डिझेल) चालणाऱ्या वाहनांचा काळ हळूहळू संपत चालल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भविष्यात पेट्रोल-डिझेल वाहने इतिहासजमा होणार आहेत.
पेट्रोल-डिझेल वाहनांना भविष्य नाही
नवी दिल्ली येथे आयोजित बसवर्ल्ड कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये मध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे भविष्य नाही. ऑटो उद्योगाने आता स्वच्छ, स्वस्त आणि पर्यायी इंधनाकडे वेगाने वळण्याची गरज आहे. गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना बायोफ्यूल आणि इतर पर्यायी इंधनाकडे वळण्याचे आवाहन केले.
त्यांच्या मते भारत मोठ्या प्रमाणावर फॉसिल फ्यूल आयात करतो. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल महाग होत आहेत, यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येतो आणि प्रदूषणातही मोठी वाढ होते. हे आर्थिक आणि पर्यावरणीय दोन्ही दृष्टीने गंभीर आव्हान आहे.
📍𝑵𝒆𝒘 𝑫𝒆𝒍𝒉𝒊 | Delivering keynote address at the Busworld India Conclave 2026
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 28, 2026
https://t.co/pi92vRNeXI
हायड्रोजन आणि स्वच्छ इंधनावर भर
गडकरी यांनी यावेळी हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे सांगितले. तसेच, या क्षेत्रात संशोधन सुरू असून, देशातील काही मार्गांवर हायड्रोजनवर चालणाऱ्या बस आणि ट्रकची चाचणीही सुरू आहे. त्यांनी स्वदेशी, स्वस्त आणि प्रदूषणमुक्त उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली.
पब्लिक ट्रान्सपोर्ट मजबूत करण्याची गरज
देशातील वाढती मोबिलिटी लक्षात घेता, मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. सध्या भारतात प्रत्येक १,००० लोकांमागे फक्त २ बस उपलब्ध आहेत. पण, जागतिक स्तरावर हा आकडा ८ बस प्रति १,००० लोक आहे. यावरून देशात बस कमतरता स्पष्ट होते.
बस उद्योगात मोठी संधी
गडकरी यांच्या मते, बस उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढीची संधी आहे. दरवर्षी सुमारे ७०,००० बसेसचे उत्पादन होते आणि या उद्योगाचा आकार सुमारे ₹३५,००० कोटी आहे. पुढील ३ वर्षांत इलेक्ट्रिक बसेसची मागणी १.५ लाख युनिटपर्यंत पोहोचू शकते, यामुळे EV बस सेगमेंटमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
बस सेफ्टी आणि क्वालिटीवर भर
गडकरी यांनी बसच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवरही लक्ष देण्याचे सांगितले. प्रवाशांच्या अपेक्षा बदलत असून, त्यांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास हवा आहे. त्यामुळे बसचे डिझाइन आणि उत्पादन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
