'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शून्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:03 IST2026-04-23T14:05:21+5:302026-04-23T15:03:33+5:30

शिवरतन अग्रवाल प्रसिद्ध स्नॅक्स कंपनी 'बिकाजी'चे संस्थापक आहेत.

Bikaji Foods Shiv Ratan Agarwal : प्रसिद्ध स्नॅक्स कंपनी 'बिकाजी'चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक शिवरतन अग्रवाल (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी चेन्नई येथे निधन झाले. ते पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह चेन्नईत थांबले होते. मात्र, सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

कौटुंबिक सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीची नुकतीच हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे अग्रवाल कुटुंब सुमारे १० दिवसांपासून चेन्नईत वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास शिवरतन यांची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र शिवरतन यांना वाचवण्यात यश आले नाही.

शिवरतन अग्रवाल यांनी १९९३ साली बीकानेरमध्ये Bikaji Foods International ची स्थापना केली. मात्र त्यांचा व्यावसायिक प्रवास याआधीच सुरू झाला होता. पारंपरिक कौटुंबिक व्यवसाय Haldiram's पासून वेगळे होत त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला होता.

बीकानेरमध्ये “शिवदीप फूड्स प्रोडक्ट्स” या नावाने त्यांनी भुजिया उत्पादन सुरू केले. भारतीय चवीला नवी ओळख देण्याच्या उद्देशाने त्यांनी “बीकाजी” हा ब्रँड निर्माण केला, जो बीकानेरचे संस्थापक राव बिका यांच्या नावावरून प्रेरित आहे.

फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अग्रवाल यांनी आपल्या दूरदृष्टी आणि मेहनतीच्या जोरावर मोठा उद्योग उभा केला. व्यवसाय सुरू करताना त्यांनी विविध देशांना भेटी देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.

त्या काळात भुजिया पूर्णपणे हाताने तयार केली जात होती. मात्र अग्रवाल यांनी मशीनद्वारे उत्पादन सुरू करून उद्योगात नवा पायंडा पाडला. Bikaji हा देशातील पहिला ब्रँड ठरला, ज्याने मशीनद्वारे भुजिया उत्पादन सुरू केले, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढली आणि गुणवत्ता सुधारली.

आज Bikaji ब्रँडने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. उत्पादनाची गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग आणि जागतिक दर्जा यावर कंपनी विशेष भर देते.

शिवरतन अग्रवाल यांच्या निधनामुळे स्नॅक उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी केवळ यशस्वी व्यवसाय उभा केला नाही, तर भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.