Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:02 IST2026-04-29T15:01:12+5:302026-04-29T15:02:25+5:30
Watermelon Price Drop In APMC Market: मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याचा थेट परिणाम आता कलिंगड बाजारावर झाला आहे.

Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याचा थेट परिणाम आता कलिंगड बाजारावर झाला आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे या कुटुंबाला विषबाधा झाल्याची चर्चा पसरल्याने कलिंगडच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याचा फटका नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या एपीएमसी बाजारपेठेला बसला असून, कलिंगडाचे दर प्रति किलो ५ ते ७ रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत.
उन्हाळा हा कलिंगड विक्रीचा मुख्य हंगाम असतो. सर्वसाधारणपणे घाऊक बाजारात कलिंगड १० ते ३५ रुपये प्रति किलो, तर किरकोळ बाजारात ३० ते १०० रुपये दराने विकले जाते. मात्र, या दुर्घटनेनंतर ग्राहकांनी कलिंगडाकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अवघ्या ५ ते ७ रुपयांत कलिंगड विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
नेमकी घटना काय?
दक्षिण मुंबईतील पायधुनी येथे राहणारे अब्दुल्ला डोकाडिया (४०), पत्नी नसरीन (३५), मुलगी आयेशा (१६) आणि झैनब (१३) या चौघांनी शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही वेळातच या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. त्यांनी जवळच्या डॉक्टरांना दाखवले. परंतु, धाकट्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जेजे रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, काही तासांतच उपाचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. या चौघांच्या मृत्युमागचे नेमके कारण काय? हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. पुढील दोन ते तीन दिवसांत हा अहवाल मिळेल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या सर्व नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात असून तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
आर्थिक तणावातून आत्महत्या?
घटना अन्नविषबाधेची वाटत असली, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. अब्दुल्ला डोकाडिया हे आर्थिक अडचणीत होते का? या दिशेने पोलीस त्यांच्या बँक खात्यांच्या तपशिलांची चौकशी करत आहेत. हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो का? याचीही पडताळणी सुरू आहे.