या '5' कॉमन हेअरस्टाइलमुळे तुमच्या केसांचं होतंय नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 07:19 PM2019-02-11T19:19:13+5:302019-02-11T19:32:47+5:30

बहुतांश महिला आजकाल आपल्या लूकसोबत काही-ना-काही तरी प्रयोग करताना दिसतात. यातही सर्वांधिक प्रयोग हे केसांवर केले जातात. आपला लूक इतरांपेक्षा वेगळा असावा, यासाठी मुलींचा हेअरकटपासून ते निरनिराळ्या हेअर स्टाइल करण्याकडे कल असतो. वेगवेगळ्या हेअर स्टाइलसाठी हॉट आर्यन, हेअर ड्रायर यांचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. पण यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होतेय, हे ध्यानात घ्या. शिवाय, यामुळे केसगळतीची समस्यादेखील निर्माण होऊ शकते.

हाय-टाइट पोनीटेल ही हेअर स्टाइल दिसायला फार सुंदर आणि आकर्षक दिसते. पण प्रत्येक दिवशी अशी हेअर स्टाइल केल्यास केसांचा घनदाटपणा कमी होतो आणि केसांचे नुकसानही होते. ही हेअरस्टाइल करताना जेव्हा तुम्ही केस मागील बाजूनं खेचता तेव्हा केस ताणले जातात आणि तुटतात.

केस स्ट्रेट करणे, ही बहुतांश महिलांची आवडती हेअर स्टाइल असते. ही स्टाइल दिसायला फार साधी दिसते आणि करण्यासही अधिक वेळ लागत नाही. केवळ हॉट स्ट्रेटनरने केस सरळ करावे लागतात. मात्र नियमित असे केल्यास तुमचे केस कमकुवत होतात. सोबतच केसांची नैसर्गिक चमकदेखील कमी होते.

पार्टी किंवा डेटवर जाण्यासाठी केसांचे कर्ल्स करणे, ही प्रत्येक महिलेची पहिली पसंत असते. काही जणींनी कामाचा भाग म्हणून बऱ्याचदा पार्टीमध्ये जाणं आवश्यक असते. पण म्हणून, प्रत्येक दिवशी केसांना कर्ल्स करणे तुम्हाला महाग पडू शकते. कर्ल्स केल्याने केस कोरडे होतात आणि केसांना फाटे फुटतात.

शाळेमध्ये असताना विद्यार्थिनींना घट्ट वेणी बांधणे बंधनकारक असते. घट्ट वेणी बांधणे केसांसाठी फायदेशीर असते, असा बऱ्याच जणींचा गैरसमज आहे. पण खरंतर घट्ट वेणीमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि यामुळे केस तुटू लागतात. सोबत केसांचा पोतही बिघडतो.

केसांसाठी वेट हेअर लूक ही स्टाइल सर्वात जास्त हानिकारक आहे. आजकाल वेट हेअर लूक ट्रेंडमध्ये आहे. पण नियमित ही हेअरस्टाइल केल्यास केस तुटू लागतात आणि केस कोरडे होण्याचीही समस्या निर्माण होते.