काहीजणांकडे कायम प्रचंड पैसा येतो, असं का? १० गोष्टी लक्षात ठेवा, घरी येईल पैसाच पैसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2026 20:05 IST2026-05-02T20:00:30+5:302026-05-02T20:05:02+5:30

habits and mindset to attract money quickly in life : simple daily habits to become financially successful : how to become financially successful : 'या' १० सवयी ज्या तुमचा खिसा कधीच रिकामा होऊ देणार नाहीत...

आपल्या सभोवताली आपण अनेकदा अशा व्यक्ती पाहतो, ज्यांच्याकडे पैशांची कधीच कमतरता नसते. मंदी असो वा महागाई, त्यांच्याकडे नेहमीच आर्थिक सुबत्ता पाहायला मिळते. अनेकांना असं वाटतं की हे केवळ त्यांच्या नशिबामुळे होतंय, पण खरी गोष्ट काही वेगळीच असते. श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवून धरणं यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे त्या व्यक्तीची 'आर्थिक मानसिकता' आणि त्याचे जगण्याबद्दलचे दृष्टिकोन. काही विशिष्ट गुण आणि सवयी अशा व्यक्तींच्या अंगी भिनलेल्या असतात, ज्यामुळे पैसा त्यांच्याकडे आकर्षित होतो(how to become financially successful).

आपल्यापैकी काहीजणांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही, त्यामुळे ते नेहमी आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसतात. हे केवळ त्यांच्या उत्पन्नामुळे नसून त्यांच्या सवयी, विचारसरणी आणि पैशांबद्दलच्या योग्य दृष्टिकोनामुळे शक्य होतं. पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो योग्य पद्धतीने वापरणं आणि वाढवणंही आवश्यक असतं. अशा व्यक्तींमध्ये कोणते गुण असतात ज्यामुळे त्यांना पैशांची कमतरता कधीच जाणवत नाही, ते पाहूयात... (habits of wealthy people).

एक स्मार्ट आणि आत्मविश्वासू व्यक्ती कधीही मस्करीतसुद्धा स्वतःला 'गरीब' म्हणत नाही. अशा व्यक्तींच्या बोलण्यात पैशांबाबत नेहमी सकारात्मकता असते. त्यांचा असा विश्वास असतो की, पैसा त्यांच्या आयुष्यात येत आहे आणि तो आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. स्वतःबद्दल "माझ्याकडे पैसे नाहीत" असे म्हणण्याऐवजी, "मी माझे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधत आहे" किंवा "मी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत आहे" असे म्हणायला सुरुवात करा, थोडक्यात काय तर पैशांबाबत कधीही नकारात्मक बोलू नका.

श्रीमंत मानसिकता असणाऱ्या व्यक्ती आपल्या सभोवतालची जागा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवतात. त्यांना हे माहित असते की, चांगल्या वातावरणामुळे विचारांमध्ये सकारात्मकता येते. यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते. आपली खोली स्वच्छ ठेवा, टेबलवर एखादे छोटे रोप लावा किंवा तुमचे काम करण्याचे टेबल नीटनेटके सजवून ठेवा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील आणि तुम्हाला अधिक 'प्रॉडक्टिव्ह' वाटेल.

कोणत्याही परिस्थितीत कायम प्रगती करत राहण्याचे विचार असलेली व्यक्ती कधीही शिकणे थांबवत नाही. ती दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही सुद्धा दररोज स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. एखादे चांगले पुस्तक वाचा, माहितीपूर्ण पॉडकास्ट ऐका किंवा एखादे नवीन कौशल्य आत्मसात करा. ही सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते आणि आयुष्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळवून देते.

तुमच्याकडे पैसा किती टिकतो, हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते. पैशांच्या बाबतीत विचार करणारी एक सुज्ञ व्यक्ती कधीही विचार न करता शॉपिंग करत नाही. अशा व्यक्ती भावनिक होऊन पैसे खर्च करण्याऐवजी अत्यंत विचारपूर्वक खर्च करतात. त्या कमी वस्तू खरेदी करतात, पण खरेदी केलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेशी (Quality) कधीच तडजोड करत नाहीत. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसते आणि पैशांचा अपव्ययही टाळला जातो.

श्रीमंत मानसिकता असणारी व्यक्ती आपले बँक बॅलन्स बघून कधीही घाबरत नाही. स्वतःची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या वेळोवेळी आपले बँक अकाउंट तपासत राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशांचा हिशोब ठेवण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही अधिक जबाबदार बनता आणि अधिक चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकता.

एक आत्मविश्वासू व्यक्ती "मी हे खरेदी करू शकत नाही" असं म्हणण्याऐवजी, "मी हे कसं खरेदी करू शकेन?" असा विचार करते. हा सकारात्मक बदल तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रवृत्त करतो.

श्रीमंत मानसिकता असणारी व्यक्ती पैशांना कधीच घाबरत नाही. पैसा हे आयुष्य अधिक चांगले बनवण्याचे एक माध्यम आहे, हे तिला ठाऊक असते. त्यामुळेच ती पैसे कमावणे, ते वाचवणे आणि योग्य ठिकाणी खर्च करणे यामध्ये संतुलन राखायला शिकते. जेव्हा तुम्ही पैशांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहता, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो.

ज्यांच्याकडे पैशांची कमी नसते, त्या व्यक्ती कधीही विनाकारण खर्च करत नाहीत. त्यांचं बजेट ठरलेलं असतं. कमावण्याआधी खर्च करण्याची सवय त्यांना नसते, उलट मिळणाऱ्या उत्पन्नातील एक ठराविक हिस्सा ते न चुकता बाजूला काढतात.

अशा व्यक्ती पैसा केवळ बँकेत साठवून न ठेवता तो वाढवण्यावर भर देतात. सोने, शेअर्स, जमीन किंवा विविध फंड्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करण्याची सवय त्यांना असते. त्यांना माहिती असतं की पैसा कामाला लावला तरच तो वाढतो.

श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट नसतो हे त्यांना ठाऊक असतं. ते कधीही 'रातोरात श्रीमंत' होण्याच्या योजनांना बळी पडत नाहीत. संयम राखून दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात, ज्यामुळे कालांतराने त्यांची संपत्ती अनेक पटींनी वाढते.