भाजपाचं मिशन नवाब मलिक, रात्री ९ वाजता ठरलं प्लॅनिंग; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीच केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:40 PM2021-11-16T19:40:52+5:302021-11-16T19:46:23+5:30

Nawab Malik vs Devendra Fadnavis: मंत्री नवाब मलिकांनी ड्रग्स प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्री नवाब मलिकांनी सातत्याने भाजपावर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला होता. त्यासाठी त्यांनी मागील सरकारच्या काळात बनवलेल्या एका गाण्याचा हवाला दिला.

मलिकांच्या या आरोपानंतर फडणवीसांनीही त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंथ असल्याचा दावा केला. त्यानंतर १९९३ च्या दंगलीतील आरोपींसोबत नवाब मलिकांनी(Nawab Malik) जमिनीचे व्यवहार केल्याचे पुरावेच सगळ्यांसमोर सादर केले. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपात भाजपानं मिशन नवाब मलिक राबवलं.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत याचा उलगडा केला. मलिकांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम केला.

मलिकांचे पुतळे कसे जाळले? हे कसं घडलं? याबाबत चंद्रकांत पाटलांनी आजच्या बैठकीत खुलासा केला. ज्या दिवशी हे पुतळे जाळण्याचं आंदोलन झालं त्याच्या आदल्या दिवशी ९ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना एक व्हिडीओ कॉल केला होता.

या व्हिडिओ कॉलमध्येच प्रदेशाध्यक्षांनी नवाब मलिकांचे पुतळे जाळा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यातील २६-२७ प्रमुख शहरात मलिकांविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांचे पुतळे जाळले असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विशेष म्हणजे इतक्या कमी वेळात हे सगळं प्लॅनिंग झालं असा खुलासाही चंद्रकांत पाटलांनी केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या व्यतिरिक्त वेगवेगळ्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत राजकीय गुन्हेगारीवरुन टोला लगावला.

एसटी कामगारांच्या संपावर म्हणाले की, आपल्या तुटपुंज्या पगारामुळे कधी पैशांअभावी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो तर कधी उपचारांअभावी आपल्या आप्तांना गमावण्याची वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर येते. एसटी कर्मचाऱ्यांच्या या वेदना असंवदेनशील महाविकास आघाडी सरकारला कधी जाणवतील का? असा सवाल त्यांनी विचारला.

तसेच मनाला दु:ख देणाऱ्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत आणि राज्य सरकारला काहीच वाटत नाही. याचे सगळ्याचे टोक म्हणजे मालेगाव-अमरावतीमध्ये झालेल्या दंगली आणि त्या दंगलीचे केलेले समर्थन आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला.

भविष्यातील सर्व आंदोलनांची आणि कार्यक्रमांची दिशा आपण ठरवलेली आहे. आपण कोणतेही राजकारण न करता नागरिकांच्या हितासाठी एक चांगला विरोध पक्ष म्हणून योग्य भूमिका घेतली आहे. आपण केलेले अनेक आंदोलन यशस्वीदेखील आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुमचे गुन्हे, तुमची चौकशी आणि त्या चौकशीतून तुम्हाला अटक होणे, या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तुम्हाला बदलता आला नाही, तर तुम्ही जनतेचे रक्षण कसे करणार ? या सरकारला आता गेंड्याची कातडी असलेले सरकार असे म्हणणे म्हणजे गेंड्याचाही अपमान करण्यासारखे झाले आहे असंही चंद्रकांतदादा म्हणाले.

Read in English