१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:14 IST2026-05-20T06:14:32+5:302026-05-20T06:14:56+5:30
Heat Wave in Maharashtra: टंचाई निवारणासाठी हयगय नको, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील लहानमोठ्या धरणांमधील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असून दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. १८ मे रोजी राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. वाढते उष्णतामान आणि संभाव्य टंचाईवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. टंचाई निवारणासाठी कोणतीही हयगय करू नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाट
एकीकडे उष्णतेने लाहीलाही तर दुसरीकडे पावसाची आशा असे चित्र येत्या चार दिवसांत राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी अमरावतीत ४६.८ तर वर्धा येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोल्याचाही पारा ४६ वर पोहोचला होता. विदर्भातील एकाही जिल्ह्यात तापमान घटण्याची शक्यता नाही.
आवाहन : अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा
भीषण उकाड्यापासून स्वत:चा बचाव करा, अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असे आवाहन सरकारने केले आहे. या शिवाय नागपूर, यवतमाळ, नांदेडमध्येही तापमान वाढतेच राहील. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे.
१८ मे रोजी ४५ अंशापार असलेले जिल्हे
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, सांगली, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
भीषण उष्णतेला राज्य सामोरे जात असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. वीज पडून, भिंत पडून आणि झाडे पडून ३४ जणांचा मृत्यू जानेवारी ते मे २०२६ दरम्यान झाला. वीज, गारपीट, भिंत पडणे, आगीने २०२ जनावरे दगावली.
नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत अवकाळी पावसाने २ लाख ४९३९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना १८४ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. राज्यातील लहानमोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याबद्दलही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.