मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:06 IST2026-05-20T06:06:16+5:302026-05-20T06:06:41+5:30
NEET paper leak: कोचिंगच्या नावे सुरू होता पेपरफुटीचा गोरखधंदा; मेडिकल कॉलेजसाठी मुलाला डॉक्टर करण्याचे होते स्वप्न; नागपुरातील दोन तर चंद्रपूरमधील एका विद्यार्थ्याच्या घरी धाड; चौकशीनंतर आता अटकेची टांगती तलवार

मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जात असलेला आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये अनेक पुरावे सापडल्यानंतर तपास यंत्रणांनी आता त्याच्या मुलाकडेही चौकशीचा मोर्चा वळवला आहे.
सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, मोटेगावकरच्या मुलाने यावर्षी बारावीची परीक्षा व नीट दिली आहे. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा त्यालाही करून दिल्याचा संशय आहे. याच अनुषंगाने पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्याची चौकशी केली आहे. मोटेगावकर याच्या मुलासोबत आरसीसी क्लास-मध्ये शिक-णाऱ्या आणखी ३ विद्यार्थी, त्यांच्या पालकांनाही चौकशीस बोलावले आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोटेगावकर याच्या खात्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे धागेदोरे सीबीआय तपासात समोर आल्याचे समजते. त्या व्यवहारांच्या आधारे सीबीआयने संबंधित विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे.
सीबीआयने रिमांड अहवालात काय म्हटले?
सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात, शिवराज मोटेगावकर याने प्रश्नपत्रिका विकून आर्थिक फायदा मिळवतानाच स्वतःच्या मुलालाही त्याचा लाभ मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला होता. अल्पवयीन असल्यामुळे मोटेगावकर याच्या मुलासोबत दोन ते तीन वकील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणा आता विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या, त्यासाठी पैसे कोणी दिले, संपूर्ण नेटवर्क कसे कार्यरत होते, याचा शोध घेत आहेत. मोटेगावकर याचे मोठे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न होते. त्यासाठी मुलगा डॉक्टर व्हावा, या उद्देशातूनच कट रचला गेला का, याचाही तपास सीबीआय करत आहे.