भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:30 IST2026-05-20T06:29:26+5:302026-05-20T06:30:03+5:30
Ashok Kharat Case: आज कोठडीसाठी पुन्हा न्यायालयात हजर करणार

भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विशेष पीएमएलए न्यायालयाने ७० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात भोंदू अशोक खरातला अटक करण्याची परवानगी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली. मंगळवारी खरातला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर हा आदेश देण्यात आला. खरातला ईडीच्या विनंतीवरून विशेष न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केल्यानंतर नाशिक कारागृहातून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर खरातला ईडीने अटक केली. बुधवारी रिमांडसाठी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
“गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा लाभ कोणाला झाला,ते पैसे कसे मिळवले, वापरले आणि ताब्यात ठेवले याचा शोध घेण्यासाठी अशोक खरातची उपस्थिती आवश्यक आहे. तसेच धार्मिक प्रभाव आणि फसवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील पीडितांकडून पैसे उकळणारा तो मुख्य व्यक्ती आहे,” असे ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा मागोवा घेण्यासाठी खरात यांची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीतर्फे सांगण्यात आले.
एप्रिल महिन्यात खरातचे निवासस्थान आणि कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान स्थावर मालमत्ता व्यवहार आणि मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, पैशांचा प्रवाह शोधण्यासाठी त्यांची तपासणी सुरू असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले.
संबंधित व्यक्तींच्या चौकशीसाठी कोठडी हवी
खरातने त्याच्या भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले असून, त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे, असे ईडीतर्फे सांगण्यात आले. पीडितांकडून गोळा केलेली रक्कम खरातने स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या नावावर स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. खरातने विविध व्यक्तींच्या नावाने ६० बँक खाती उघडली होती. या सर्व खात्यांना त्याचा स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडलेला होता आणि त्या खात्यांमध्ये तोच एकमेव नामनिर्देशित व्यक्ती होता, असे तपासात समोर आले होते.
भक्तांच्या संमतीशिवाय कागदपत्रांचा वापर
ईडीच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये एका सहकारी पतसंस्थेत एका दिवसात ४३ खाती उघडण्यात आली होती. ही खाती “भक्त” आणि इतर व्यक्तींच्या कागदपत्रांचा त्यांच्या संमतीशिवाय वापर करून उघडण्यात आली होती. या खात्यांमधून ७० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे तपासात दिसून आले.