आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:57 IST2026-05-20T06:26:02+5:302026-05-20T06:57:16+5:30
मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागात सफाई करण्यासाठी मुंडे यांना पाठविण्यात आल्याचे म्हटले जाते.

आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पोस्टिंगची प्रतीक्षा मंगळवारी संपली. त्यांची नियुक्ती अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या २१ वर्षांत त्यांची ही २५ वी बदली आहे.
मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागात सफाई करण्यासाठी मुंडे यांना पाठविण्यात आल्याचे म्हटले जाते. अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी त्यांचे संबंध कसे असतील, या बाबतही उत्सुकता असेल. मंत्री कार्यालयातील लाचखोरीपासून मंत्र्यांच्या कथित चित्रफितीपर्यंत झिरवाळ हे वादात सापडले होते.
मुंढे यांची गेल्या एप्रिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या बदलीला लगेच स्थगिती देण्यात आली होती. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. राज्य सरकारने अन्य तीन आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली केली असून दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार, तर राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन; मुंबईच्या एमडी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.