CoronaVirus: एक सॅल्यूट तर बनतोच! कन्येचे लग्न नंतर, आधी 'अनाथ' झालेल्या कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

Published: May 6, 2021 10:59 AM2021-05-06T10:59:54+5:302021-05-06T11:24:28+5:30

CoronaVirus: कोरोना काळात सध्या असे अनेक मृतदेह स्मशानात येत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या पोटच्या मुलीचे लग्नदेखील पुढे ढकलले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या हाहाकारात जगाला दोन चेहरे दिसले आहेत. एक ते लोक जे कोरोना झाल्याचे कळताच आपल्यांची साथ सोडत आहेत, दुसरे ते लोक जे मृत कोरोनाबाधित ओळखीचा पाळखीचा नसला तरी माणुसकी जिवंत ठेवत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.

कोरोना काळात सध्या असे अनेक मृतदेह स्मशानात येत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या पोटच्या मुलीचे लग्नदेखील पुढे ढकलले आहे.

दिल्ली पोलीसमध्ये असलेले एएसआय राकेश कुमार यांनी अवघ्या देशाचे हृदय जिंकले आहे. अनेकदा स्मशानात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक किंवा दोनच व्यक्ती येत आहेत. या व्यक्ती सुद्धा कोरोनाला घाबरून स्मशानाबाहेरच राहत आहेत.

यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार कोण, असा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे दिल्लीच्या एका स्मशानमभूमीत हे एएसआय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

राकेश कुमार हे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते सध्या लोदी रोड स्मशानात येणाऱ्या कोरोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास मदत करत आहेत. 13 एप्रिलपासून ते तिथेच आहेत.

सध्या पोलिसांचा बंदोबस्तही मोठा लागत आहे. तरी देखील ते हे काम प्रामुख्याने करत आहेत. यासाठी त्यांनी मुलीचे लग्नदेखील पुढे ढकलले आहे. मुलीचे लग्न नंतरही करता येईल, सध्या माणुसकीचे नाते जपण्याची वेळ आहे, असे ते सांगतात.

त्यांच्या या निर्णयावर कुटुंबातील सदस्यदेखील राजी आहेत. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही का, असे विचारले असात त्यांनी भीती कसली? कोणाला तरी हे काम करावेच लागणार आहे. जर प्रत्येकजण यापासून दूर पळू लागला तर ही यंत्रणा कशी चालेल? मानवतेचा धर्म पाळायलाच हवा, असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे राकेश कुमार यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच ते स्मशानभूमीमध्ये वावरताना मास्क आणि ग्लोव्हज घालून असतात. कोरोना बाधित मृतांच्या नातेवाईकांना ते पोलीस अधिकारी आहेत आणि अंत्यसंस्कार करतात हे समजते तेव्हा ते अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी राकेश यांना सलाम करतात.

एवढेच नाही तर दिल्ली पोलिसही त्यांची प्रशंसा करत आहे. ड्यूटी सोडून ते हे काम करत असले तरी देखील डीसीपी आर पी मीणा यांनीदेखील त्यांना या कामासाठी पाठिंबा दिलेला आहे. तसेच ते राकेश यांची स्तुतीदेखील करतात.

राकेश यांनी आतापर्यंत 1100 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यात 60 मृतदेह असे होते, ज्यांच्या कुटुंबीयांपैकी एखादाच तिथे आलेला होता. एकदा तर त्यांना सिंगापूरला अडकलेल्या मुलाने आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!