हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:44 IST2026-04-16T12:27:18+5:302026-04-16T12:44:10+5:30

लष्करचा प्रमुख दहशतवादी आमिर हमजावर पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

Lashkar Leader Amir Hamza Targeted by Unknown Gunmen in Pakistan | हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात

हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात

LAT Amir Hamza:पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांकडून दहशतवाद्यांना संपवण्याचे प्रकार सुरु आहेत. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक आणि हाफिज सईदचा सर्वात विश्वासू सहकारी अमीर हमजा याच्यावर लाहोरमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. गुरुवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला असून, त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेमका हल्ला कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, ६६ वर्षीय अमीर हमजा लाहोरमधील एका चॅनेलच्या ऑफिसबाहेर उभा असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हमजाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

कोण आहे अमीर हमजा?

अमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. त्याने हाफिज सईदच्या खांद्याला खांदा लावून ही दहशतवादी संघटना उभी केली. भारतात झालेल्या अनेक भीषण दहशतवादी हल्ल्यांमागे हमजाचे डोके असल्याचे मानले जाते. तो अफगाण मुजाहिद्दीनचा जुना सहकारी आहे.
हमजा आपल्या भडकाऊ भाषणांसाठी आणि लिखाणासाठी कुप्रसिद्ध आहे. तो लष्करच्या अधिकृत प्रकाशनाचा संपादक होता. २००२ मध्ये त्याने काफिला दावत और शहादत नावाचे पुस्तकही लिहिले होते.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना घोषित केले असून हमजाचा समावेश प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. हमजा हा फक्त लष्करचा नेता नव्हता, तर तो संघटनेच्या समितीचा महत्त्वाचा सदस्य होता. संघटनेसाठी निधी गोळा करणे, तरुणांची भरती करणे आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करणे यामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायची.

लष्करशी फारकत आणि नवीन गट

२०१८ मध्ये जेव्हा पाकिस्तान सरकारने जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत यांसारख्या लष्करशी संबंधित संस्थांवर कारवाई केली, तेव्हा हमजाने लष्करपासून स्वतःला लांब केले होते. त्यानंतर त्याने जैश-ए-मन्काफा नावाचा एक नवीन गट स्थापन केला. या नवीन गटाच्या माध्यमातून तो जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होता.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये दहशत

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतविरोधी दहशतवाद्यांवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. हमजावरील या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी गटांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सुरक्षेच्या कारणास्तव अनेक दहशतवादी गायब झाले आहेत. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title : हाफिज सईद के करीबी अमीर हमजा पर गोलीबारी, जीवन के लिए संघर्ष

Web Summary : लश्कर-ए-तैयबा के सह-संस्थापक अमीर हमजा, जो हाफिज सईद के करीबी सहयोगी हैं, लाहौर में गोलीबारी में गंभीर रूप से घायल हो गए। 66 वर्षीय हमजा, जो भड़काऊ भाषणों और भारत में कई आतंकी हमलों में शामिल होने के लिए जाने जाते हैं, वर्तमान में अस्पताल में जीवन के लिए संघर्ष कर रहे हैं। इस हमले से पाकिस्तान में आतंकवादी समूहों में दहशत फैल गई है।

Web Title : Hafiz Saeed's Aide Amir Hamza Shot, Battles for Life

Web Summary : Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza, a close aide to Hafiz Saeed, was critically injured in a shooting in Lahore. The 66-year-old, known for inflammatory speeches and involvement in multiple terror attacks in India, is currently battling for his life in a hospital. The attack has caused panic among terrorist groups in Pakistan.