TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:38 IST2026-04-16T13:37:40+5:302026-04-16T13:38:38+5:30
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात आली आहे. सुरुवातीला एसआयटी तपासाचे लक्ष तक्रार आणि आरोपींची भूमिका यावरच होते, परंतु आता तपासाची व्याप्ती वाढली आहे

TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
नाशिक - शहरातील TCS BPO कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मुस्लीम धर्मांतरासाठी दबाव आणणे आणि लैंगिक अत्याचार करणे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. धर्मांतराचा हा प्रकार बाहेरील लोकांकडून नियंत्रित होता का याची चौकशी सध्या होत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना फक्त TCS कडून सॅलरी मिळायची की अन्य ठिकाणाहूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे यायचे याचा तपास पोलीस करत आहेत.
माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्याची सर्व माहिती जमा केली जात आहे. त्यात त्यांची सॅलरी, इतर व्यवहार आणि अन्य मार्गाने येणाऱ्या कमाईचा शोध घेतला जात आहे. या आरोपींना कुणाकडून फंडिंग मिळत होती का, ज्याचा वापर करून हे लोक धर्मांतरासाठी काम करत होते हे तपासले जात आहे. हा तपास केवळ आरोपींपुरता मर्यादित राहणार नाही तर सर्व टीम लीडर्स, संबंधिक कर्मचाऱ्यांच्या खात्याची चौकशी केली जाणार आहे. त्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी निदा खान, जिच्याकडे एचआरची भूमिका होती. ती संपूर्ण नेटवर्क सांभाळत असल्याचं दिसून येते.
SIT तपासात नवा अँगल
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात आली आहे. सुरुवातीला एसआयटी तपासाचे लक्ष तक्रार आणि आरोपींची भूमिका यावरच होते, परंतु आता तपासाची व्याप्ती वाढली आहे. हे प्रकरण वैयक्तिक होते की त्यामागे एखादी संघटना सक्रीय होती हे समजून घेतले जात आहे. या तपासात बँक खात्याची माहिती महत्त्वाची ठरेल. जर सॅलरीव्यतिरिक्त अन्य मार्गातून या लोकांना पैसे मिळत असतील तर हे प्रकरण आणखी गंभीर होऊ शकते.
निदा खान अजूनही फरार
निदा खान हिचे नाव एफआयआरच्या सुरुवातीलाच समोर आले होते. ती अशा टीम लीडर्सला पाठीशी घालत होती, ज्यांच्यावर महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. आता या लोकांच्या बँक खात्याची चौकशी होत आहे. निदा खान अजूनही फरार आहे. तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तिच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा पोलिसांना अंदाज आहे. एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. आता यात ८ हून अधिक पीडित महिला समोर आल्या आहेत.