पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:05 IST2026-04-16T15:04:02+5:302026-04-16T15:05:10+5:30
याआधी १० जानेवारीला पाकिस्तानी नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका नौदल सरावात हवेत मारा करणारी मिसाइल चाचणी केली होती.

पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
इस्लामाबाद - पाकिस्तानने जहाजातून लॉन्च होणाऱ्या एंटी शिप मिसाइलची यशस्वीपणे चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. पाकिस्तानी नौदलाने ज्या एंटी शिप मिसाइलची चाचणी केली ती स्वदेशी बनावटीची आहे. या मिसाइलच्या यशस्वी चाचणीने देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी झेप घेतल्याचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि नौदलप्रमुख अॅडमिरल नवीद अश्रफ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, प्रत्यक्ष गोळीबार सरावावेळी या क्षेपणास्त्राने लांब पल्ल्यावरून आणि वेगवान गतीने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. ही मिसाइल पूर्वीच्या सिस्टमपेक्षा अधिक मजबूत आहे कारण त्यात एक एडवान्स गाइडेंस पॅकेज आणि उत्तम मॅन्यूवरेबिलिटी आहे. ही मिसाइल बाह्य धोके टाळण्यासाठी, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि अचूकतेने मारक हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या प्रक्षेपणाला देशाच्या 'अचूक-हल्ला' क्षमतेचे प्रदर्शन असल्याचं पाकिस्तानी लष्कराने सांगितले आहे.
या चाचणीमुळे पाकिस्तान नौदलाची पारंपरिक क्षेत्रातील सागरी विश्वसनीय प्रतिबंधक क्षमता मजबूत होईल आणि प्रदेशात सागरी सुरक्षा व स्थिरता सुनिश्चित होईल. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम विशेषतः भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याआधी १० जानेवारीला पाकिस्तानी नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका नौदल सरावात हवेत मारा करणारी मिसाइल चाचणी केली होती. या काळात नौदल युद्धाच्या बदलत्या पद्धतींनुसार पारंपरिक आणि मानवरहित अशा दोन्ही क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षण दलाचे फिल्ड मार्शल असीम मुनीर, राष्ट्रपती आसिफ अली जरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि तिन्ही सैन्य प्रमुखांनी हा पराक्रम साधल्याबद्दल संबंधित टीमचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराच्या मिडिया विंगने दिली आहे.
पाकिस्ताननं जारी केला होता NOTAM
पाकिस्तान एका संशयित क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत होता आणि यासाठी त्यांनी नोटम (NOTAM) सुद्धा जारी केला होता. पाकिस्तान अरबी समुद्रात काही तरी कुरापती करणार होता, परंतु त्याआधीच भारतीय नौदलाने मिसाइल ट्रॅकिंग सिस्टमनं सज्ज असलेली देखरेख ठेवणारी युद्धनौका INS ध्रुव अरबी समुद्रात उतरवली होती. पाकिस्ताननं NOTAM सोबतच मेरिटाइम वॉर्निंगही प्रसिद्ध केली होती. कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानीजवळील सागरी क्षेत्रात सुमारे ४१५ किलोमीटर ते ४५० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रासाठी सागरी इशारा जारी करण्यात आला होता.