‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:29 IST2026-04-16T14:28:33+5:302026-04-16T14:29:04+5:30
Delimitation Bill: आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. सरकारने हे विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवताच गोंधळाला सुरुवात झाली.

‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. सरकारने हे विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवताच गोंधळाला सुरुवात झाली. विरोधी पक्षांनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचे सांगितले. तसेच त्यावर एका पाठोपाठ एक आक्षेप घेतले. यचदरम्यान, डीएमकेचे ज्येष्ठ नेते टी आर बालू यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला. तसेच सँडविच बिल असा त्याचा उल्लेख केला. त्यावरून लोकसभा अध्यक्षांनी बालू यांना टोला लगावला आहे.
डीएमकेचे ज्येष्ठ नेते असलेल्या टी. आर. बालू यांनी सरकारने सभागृहात सादर केलेल्या तिन्ही विधेयकांचा विरोध केला. तसेच ही तिन्ही सँडविच विधेयके आहेत, ती एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध करत आहोत. असे सांगितले. तसेच या विधेयकांना विरोध असल्याने आम्ही काळे झेंडे दाखवले आहेत, असे बालू यांनी सांगितले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बालू यांना खडेबोल सुनावले, तुम्ही सभागृहामध्ये पिवळे झेंडे दाखवा, अथवा काळे झेंडे दाखवा, त्यामुळे सभागृहाला काही फरक पडत नाही, असा टोला लगावला.
केंद्र सरकारने आणलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला डीएमके आधीपासूनच विरोध आहे. तसेच संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच डीएमकेने आक्रमक पवित्रा घेतला होता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित पुनर्रचना विधेयकाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली होती. यादरम्यान, त्यांनी या विधेयकाची एक प्रतही जाळली होती.