दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:12 IST2026-04-16T14:10:46+5:302026-04-16T14:12:40+5:30
Crime News In Marathi : लग्नाच्या ४ दिवस आधी झालेल्या या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली आहे.

दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या इंदिरा विहार परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता आक्रोशाचा आवाज घुमत आहे. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना, नवरदेवाच्या प्रेयसीने रागाच्या भरात होणाऱ्या नवरीवर अॅसिड फेकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणीचा चेहरा आणि डोळे गंभीररित्या भाजले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मैत्रिणीच्या रूपात आली काळ बनून!
पीडित तरुणीच्या घरी मंगळवारी दुपारी मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. नातेवाईक आणि शेजारी-पाजारी गाण्यांच्या तालावर थिरकत होते. दरम्यान, नवरदेवाशी मागील ५ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेली त्याची प्रेयसी त्या ठिकाणी पोहोचली. विशेष म्हणजे, ही आरोपी तरुणी पीडितेची शेजारीच होती. त्यामुळे ती घरात आल्यावर कोणालाही संशय आला नाही. दोघींमध्ये काही वेळ मेहंदीच्या डिझाईनवरून गप्पाही झाल्या. मात्र, बोलता बोलता आरोपीने अचानक बॅगेतून अॅसिडची बाटली काढली आणि नवरीच्या चेहऱ्यावर ओतली.
सुडाच्या भावनेने उद्ध्वस्त केले आयुष्य
अॅसिड अंगावर पडताच नवरी वेदनेने विव्हळू लागली. घरच्यांना काही समजण्याच्या आतच आरोपीने पुन्हा एकदा तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नातेवाईकांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या डोळ्यांना आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्नामुळे होती नाराज
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी तरुणीचे नवरदेवाशी दीर्घकाळापासून संबंध होते. मात्र, प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरल्याने ती प्रचंड संतापली होती. 'तू माझा नाहीस तर कोणाचाच होऊ देणार नाही' या ईर्षेतून तिने हा कट रचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तिने अॅसिड कुठून मिळवले याचा तपास आता पोलीस करत आहेत.