जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 22:06 IST2026-04-15T22:04:19+5:302026-04-15T22:06:00+5:30
Iran US Naval Blockade : अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिन्ही प्रमुख समुद्र बंद झाल्यास जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल?

जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाने आता टोक गाठले आहे. अमेरिकेने होर्मुजची सामुद्रधुनी आणि इराणच्या बंदरानजीक १० हजार कमांडो तैनात करून 'अवैध नौसैनिक नाकेबंदी' लागू केल्यानंतर, इराणने जगाला हादरवणारी धमकी दिली आहे. जर अमेरिकेची ही कारवाई थांबली नाही, तर इराण फारसची खाडी, ओमानची खाडी आणि लाल समुद्र या तिन्ही महत्त्वाच्या जलमार्गांतून होणारा संपूर्ण आयात-निर्यात व्यापार रोखून धरेल.
इराणी सैन्य मुख्यालयाने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेची ही कृती नुकत्याच झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन आहे. अमेरिकन युद्धनौका इराणी तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याने, इराणने आता प्रति-नाकेबंदीची घोषणा केली आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापाराचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे.
इराणचा 'प्लॅन-बी': तिन्ही समुद्र बंद करणार!
१. आयात-निर्यात शून्यावर: जर अमेरिकेने होर्मुजवर नाकेबंदी केली, तर इराण पर्शियन खाडी आणि ओमानच्या समुद्रात कोणत्याही प्रकारच्या आयात-निर्यात हालचालींना परवानगी देणार नाही.
२. लाल समुद्रावर ताबा: अमेरिकन नौदलाने आपला हट्ट सोडला नाही, तर इराणची सशस्त्र सेना लाल समुद्राच्या मार्गावरून होणारा जागतिक व्यापार पूर्णपणे ठप्प करेल.
३. जगाला बसणार फटका: या नाकेबंदीमुळे केवळ इराणचेच नाही, तर जगाचा २० ते ३० टक्के व्यापार ज्या मार्गावरून चालतो, तो मार्गच बंद करण्याची तयारी इराणने दर्शवली आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे इराणने लाल समुद्रातील वाहतूक बंद करण्याची धमकी दिली आहे. भौगोलिकदृष्ट्या लाल समुद्र इराणपासून दूर असला, तरी इराणच्या या घोषणेमुळे सौदी अरबची अडचण वाढणार आहे. होर्मुज बंद झाल्यानंतर सौदी अरब लाल समुद्राच्या मार्गे तेल निर्यात करत आहे. आता हा मार्गही धोक्यात आला आहे. जगातील १५% समुद्री व्यापार आणि ३०% कंटेनर वाहतूक याच मार्गाने स्वेज कालव्याद्वारे होते.
ऊर्जा बाजारात हाहाकार माजण्याची शक्यता
फारसच्या खाडीतून जगाचा २० टक्क्यांहून अधिक तेल पुरवठा होतो. अमेरिकेच्या १० हजार कमांडोंनी आधीच होर्मुजमधील वाहतूक शून्यावर आणली आहे. आता इराणने तिन्ही बाजूने रस्ता रोखल्यास कच्च्या तेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात, ज्याचा थेट परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.
ट्रम्प यांची नवी खेळी: होर्मुज उघडणार?
दरम्यान, बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान करत 'होर्मुज स्ट्रेट' पुन्हा उघडण्याबाबत भाष्य केले आहे. मात्र, इराणने याकडे केवळ एक राजकीय डावपेच म्हणून पाहिले असून, जोपर्यंत अमेरिकन नौदल आणि १० हजार कमांडो मागे हटत नाहीत, तोपर्यंत तणाव कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.