इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:15 IST2026-04-15T19:48:15+5:302026-04-15T20:15:38+5:30
इराणचा एक तेल टँकर पूर्वसूचनेशिवाय गुजरातमध्ये दाखल झाला आहे, पण तेल शुद्धीकरण कंपन्या ते तेल घेण्यास नकार देत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने त्याची कारणेही देण्यात आली आहेत.

इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
इराणचे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणारे 'डेर्या' हे अतिविशाल जहाज गुजरातच्या किनाऱ्यावर दाखल झाले आहे. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमधील तांत्रिक अटींमुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी हा माल स्वीकारण्यास नकार दिला आहे. २० मार्चनंतर या जहाजात तेल भरण्यात आल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
ट्रम्प प्रशासनाने २० मार्च रोजी ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली होती. या सवलतीनुसार, २० मार्चपूर्वी जहाजावर भरलेल्या तेलाची विक्री १९ एप्रिलपर्यंत करण्यास परवानगी होती. मात्र, 'केप्लर'च्या ट्रॅकिंग डेटानुसार, 'डेर्या' जहाजात२८ मार्च रोजी तेल भरले. ही तारीख सवलतीच्या मर्यादेबाहेर असल्याने, हे तेल खरेदी केल्यास भारतीय कंपन्यांवर अमेरिकेच्या निर्बंधांची टांगती तलवार असेल.
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
२० मार्च रोजी, ट्रम्प प्रशासनाने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशाने, समुद्रात अडकलेल्या इराणी तेलाच्या विक्रीला परवानगी देणारी ३०-दिवसांची निर्बंधमाफी जारी केली. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या परवान्यानुसार, या माफीमुळे २० मार्च ते १९ एप्रिल दरम्यान जहाजांवर आधीच भरलेल्या इराणी कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीला परवानगी मिळाली.
सवलतीअंतर्गत अंतिम मुदतीनंतर भरलेला माल स्वीकारल्यास खरेदीदारांना अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, यामुळे भारतीय रिफायनर्सकडून तो माल स्वीकारण्याची शक्यता कमी होते.
अमेरिका ही सूट वाढवणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने काही दिवसापूर्वीच सूट मिळाल्यानंतर इराणकडून काही तेल खरेदी केले, परंतु ही खरेदी विहित मुदतीतच करण्यात आली होती. अमेरिकेनेही निर्बंधांमधील सूट वाढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलानेही इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केली आहे.
इराणी तेलवाहू जहाज 'डेर्या'ला खरेदीदार शोधण्यात अडचण येऊ शकते. जागतिक जहाज वाहतूक डेटाबेसनुसार, या जहाजावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत आणि ते इराणच्या 'नॅशनल इराणी टँकर कंपनी'द्वारे चालवले जाते. केप्लरच्या 'मरीनट्रॅफिक' सेवेच्या डेटानुसार, बुधवार दुपारपर्यंत हे जहाज गुजरातजवळच होते. या जहाजमधील तेल खरेदी करण्यास भारतीय रिफयनरी कंपन्यांनी नकार दिला आहे.
अमेरिकेने दिलेल्या सवलतीनंतर, इराणचे तेल घेऊन जाणारे किमान दोन टँकर आणि एलपीजी घेऊन जाणारा एक टँकर गेल्या काही दिवसांत भारतीय बंदरांवर दाखल झाले. जवळपास सात वर्षांनंतर इराणकडून भारताला झालेला हा अशा प्रकारचा पहिलाच ऊर्जा पुरवठा आहे.