वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 21:26 IST2026-04-15T21:25:21+5:302026-04-15T21:26:44+5:30
Smart Meter Issues: वाराणसीतील ग्रामीण भागात स्मार्ट मीटरमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. २ युनिट वापरासाठी २ हजार रुपये बिल आल्याने खळबळ उडाली आहे.

वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या वीज विभागाचा भोंगळ कारभार वाराणसीच्या ग्रामीण भागात चव्हाट्यावर आला आहे. मीटरच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे सामान्य ग्राहकांचे शोषण सुरू असून, तक्रार करणाऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.
२ युनिट वापरासाठी २,००० रुपये बिल!
खालिसपूर येथील व्यावसायिक अंजनी पांडेय यांची ही कहाणी संतापजनक आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मंदीमुळे दुकान बहुतांश काळ बंद असतानाही, संपूर्ण महिन्यात केवळ २ युनिट वीज वापर झाला. मात्र, वीज विभागाने त्यांना २,००० रुपयांचे बिल पाठवून दिले. मार्च महिन्यातही हाच प्रकार घडला.
पांडेय यांनी या प्रकरणाचा व्हिडिओ पुराव्यासह अधिकाऱ्यांना पाठवला आणि तक्रार केली. मात्र, बिल दुरुस्त करण्याऐवजी मंगळवारी त्यांच्या दुकानाची वीजच तोडण्यात आली.
कनेक्शन कापले तरी बिल ५ हजारांवर!
असाच अनुभव मानापूरचे संतोष बेनबंशी यांना आला. ४,००० रुपयांच्या थकीत बिलामुळे त्यांचे कनेक्शन आधीच कापण्यात आले होते. तरीही त्यांचे बिल वाढून ५,००० रुपये आले आहे. कोणताही अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
अधिकाऱ्यांची अजब सारवासारव
या प्रकरणावर एसडीओ प्रशांत शुक्ला यांनी अजब उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, "स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळत आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही स्मार्ट मीटरचे दररोज १० रुपये भाडे लागते, ज्यामुळे बिल वाढते." लवकरच या संदर्भात जागरूकता अभियान राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, वापराविना हजारो रुपयांचे बिल कसे येते, याचे ठोस उत्तर विभागाकडे नाही.