Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:40 IST2026-04-15T17:38:24+5:302026-04-15T17:40:01+5:30
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी त्यांनी असा दावा केला की, जेव्हा त्या कोलकाता विमानतळाकडे जात होत्या, तेव्हा केंद्रीय दलांनी त्यांच्या कारची झडती घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यापूर्वी, त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने मंगळवारी आरोप केला होता की, निवडणूक आयोगाने टीएमसी नेत्यांच्या वाहनांची 'सखोल तपासणी' करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर केंद्रीय दलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दररोज त्यांच्या कारची तपासणी करावी. त्या म्हणाल्या, "आज जेव्हा मी कोलकाता विमानतळावर जात होते, तेव्हा केंद्रीय दलांनी माझी कार तपासण्याचा प्रयत्न केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दररोज माझी कार तपासा."
तृणमूल काँग्रेसने मंगळवारी आरोप केला होता की, निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून केवळ त्यांच्याच नेत्यांच्या, विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांच्या वाहनांची सुरक्षा दलांकडून 'तपासणी' केली जात आहे. सत्ताधारी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले, "अशा प्रकारच्या सखोल तपासासाठी केवळ आमच्याच पक्षाच्या नेत्यांची निवड का केली जात आहे, तर इतरांना का सोडून दिले जात आहे? हे मुद्दाम टार्गेट करण्याचं प्रकरण आहे."
तृणमूलच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पश्चिम बंगालच्या २९४ सदस्यांच्या विधानसभेसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.