अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:28 IST2026-04-15T18:14:04+5:302026-04-15T18:28:02+5:30
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच, अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला शहरात एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचे तापमान जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता, अंगावर कुठल्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे कडक उन्हाचा तडाखा बसून या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
अकोला जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर
अकोला जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून सूर्या आग ओकत आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) अकोल्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. १० एप्रिलपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
तापमानाचा चढता आलेख
१४ एप्रिल : ४४.०°C
१३ एप्रिल : ४३.८°C
१२ एप्रिल : ४३.१°C
११ एप्रिल : ४२.१°C
१० एप्रिल : ४०.१°C
पोलिसांनी काय सांगितले?
"मृतदेहावर जखमा नाहीत, त्यामुळे उष्माघाताचा अंदाज आहे. तरीही आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत," अशी माहिती जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी दिली.
अकोल्यातील या घटनेने प्रशासनाचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.