भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:00 IST2026-04-15T19:58:35+5:302026-04-15T20:00:16+5:30
Nagpur News: महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्वीकृत सदस्य करून करण्यात आला आहे.

भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
नागपूर : महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बुधवारी भाजपच्या सहा व शिवसेनेच्या एका सदस्याच्या नावाची घोषणा केली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या महापालिकेतील स्विकृत सदस्यांच्या यादीत देवेंद्र मेहर (पूर्व नागपूर), विनोद बघेल (पश्चिम नागपूर), संजय ठाकरे (दक्षिण नागपूर), जितू ठाकूर (उत्तर नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर) आणि सुबोध आचार्य (मध्य नागपूर) या सहा नावांचा समावेश आहे. या सर्वांनी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच शिंदेसेनेचे शहर प्रमुख सूरज गोजे यांचाही समावेश असून मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सर्वांनी स्विकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केले आहे. २० एप्रिल रोजी होणाऱ्या मनपा सभेत स्विकृत सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाईल.
मनपा निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली होती. परंतु जागा वाटपावरुन शिंदेसेनेत नाराजी होती. चार जागा दिल्या होत्या. परंतु या जागावर भाजपने आपलेच उमेदवार दिले होते.
शिंदेसेनेचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. सूरज गोजे यांना स्विकृत सदस्यपद देवून शिंदेसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.