याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:51 IST2026-04-15T15:50:25+5:302026-04-15T15:51:55+5:30
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून राजकारणाची सुरूवात करणारे सम्राट चौधरी आता भाजपाचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री बनले. पण, भाजपाच्या इतर नेत्यांना मागे सारत मोठ्या पदावर पोहोचलेले चौधरी एकमेव नाहीत.

याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बनवण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण झाले. राष्ट्रीय जनता दल, जनता दल संयुक्त या पक्षांमधून आलेले सम्राट चौधरी मुख्यमंत्री बनले. पण, भाजपामध्ये येऊन पक्षातील इतर नेत्यांना मागे टाकत मुख्यमंत्री बनलेले सम्राट चौधरी काही एकमेव नेते नाहीत. ९ असे नेते आहेत, ज्यांनी भाजपामध्ये आल्यानंतर थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली.
सम्राट चौधरी २०१७ मध्ये आले भाजपात
शकुनी चौधरी यांचे पुत्र असलेले सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री बनले. ९० च्या दशकात राजकारणात पाऊल ठेवलेल्या सम्राट चौधरींनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात काम केले. राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले, वादानंतर राजीनामा दिला.
२०१४ मध्ये ते नितीश कुमार यांच्या पक्षात आले. पण, तिथे त्यांचे मन फार रमले नाही. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज झालेले सम्राट चौधरी २०१७ मध्ये भाजपामध्ये आले. त्यानंतर त्यांचे राजकीय वजन वाढत गेले. आधी विधान परिषद विरोधी पक्षनेता, बिहारचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री बनले.
काँग्रेसचे हिमंत बिस्वा सरमा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा भाजपाशी पूर्वी काही संबंध नव्हता. ते मूळचे काँग्रेसचे नेते. तरुण गोगोई यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. पण, राजकीय महत्त्वाकांक्षामुळे त्यांनी २०१५ मध्ये भाजपात प्रवेश केला.
२०१६ मध्ये निवडणुका झाल्या आणि भाजपाच्या सरकारमध्ये ते मंत्री बनले. २०२१ मध्ये आसामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपाने सत्ता राखली आणि हिमंत बिस्वा सरमा थेट मुख्यमंत्री बनले. आता २०२६ ची निवडणूकही भाजपा त्यांच्याच चेहऱ्यावर लढत आहे.
आसामामध्ये दुसऱ्या पक्षातून आलेल्या आणखी एका नेत्याला भाजपाने मुख्यमंत्री केलं होतं, ते म्हणजे सर्बानंद सोनोवाल. २०१६ मध्ये सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री बनले. भाजपाने त्यांच्याकडे आसामची सूत्रे दिली. खरंतर सर्बानंद सोनोवाल यांचा त्यापूर्वी भाजपाशी काही संबंध नव्हता. त्याचा राजकीय प्रवास ऑल आसाम स्टुडण्डस् युनियनमधून सुरू झाला.
पुढे आसाम गण परिषदमध्ये ते सामील झाले. २०११ मध्ये आसाम गण परिषद सोडून ते भाजपामध्ये आले आणि त्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केले.
एन. बीरेन सिंह आणि युमनाम खेमचंद सिंह
गेल्या काही वर्षांपासून हिंसेमुळे चर्चेत असलेल्या मणिपूरमध्येही भाजपा दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं. २०१७ मध्ये पहिल्यांदा भाजपाचे सरकार आले. एन. बीरेन सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. बीरेन सिंह ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, ना भाजपाशी. डेमोक्रटिक रिव्हॉल्युशनरी पीपल्स पार्टीतून त्यांचे राजकारण सुरू झाले. आमदार बनले.
पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सरकार असताना ते मंत्री राहिले. पण, २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. २०१७ मध्ये भाजपाचे सरकार आले आणि बीरेन सिंह मुख्यमंत्री बनले. २०२२ मध्ये पुन्हा भाजपाने सत्ता राखली आणि बीरेन सिंह मुख्यमंत्री पदी कायम राहिले. २०२५ मध्ये हिंसाचारामुळे त्यांना पद सोडावे लागेल.
भाजपाने युमना खेमचंद सिंह यांना मुख्यमंत्री केले. तेही मूळचे भाजपाचे नाहीत. खेमचंद यांनी २००२ मध्ये बीरेन सिंह यांच्यासोबतच डेमोक्रटिक रिव्हॉल्युशनरी पीपल्स पार्टीतून राजकारण सुरू केले. २०१३ मध्ये भाजपामध्ये सामील झाले आणि २०२५ मध्ये भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले.
गेगोंगा आणि पेमा खांडू
अरुणाचल प्रदेशातही भाजपाने दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना राज्यातील सर्वोच्च पदी बसवले. काँग्रेसमधून सक्रिय राजकारणात आलेले पेमा खांडू हे भाजपाकडून मुख्यमंत्री बनले. २००० मध्ये पेमा खांडू काँग्रेसमध्ये आले. २०१६ मध्ये ते मुख्यमंत्री बनले, पण पाठिंबा असलेले सर्व आमदार सोबत घेऊन ते भाजपात गेले आणि भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केलं. २०१९ मध्ये भाजपाने दुसऱ्यांदा त्यांना मुख्यमंत्री केलं. २०२४ मध्येही ते मुख्यमंत्री बनले.
काँग्रेसचे माणिक साहा भाजपाचे मुख्यमंत्री
त्रिपुरामध्ये भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले. २०१६ मध्ये काँग्रेसमधून ते भाजपामध्ये आले होते. आधी प्रदेशाध्यक्ष आणि २०२२ मध्ये मुख्यमंत्री बनले. २०२३ मध्ये पुन्हा पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवले.
कर्नाटकात बसवराज बोम्मई
दक्षिण भारताचा विचार केला तर भाजपाला आतापर्यंत कर्नाटकामध्येच सरकार स्थापन करता आलेले आहे. कर्नाटकात येडीयुरप्पा हे भाजपाचा चेहरा राहिले. पण, २०२१ मध्ये भाजपाने त्यांना बाजूला करून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.
बोम्मई हे मूळचे भाजपाचे नाहीत. बोम्मई यांनी जनता दलातून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. २००८ मध्ये ते भाजपामध्ये सामील झाले. येडीयुरप्पांच्या सरकारमध्ये ते मंत्री बनले. आणि नंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले.
इतरही काही नेते आहे, ज्यांना भाजपाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केले. यात झारखंडमध्ये अर्जून मुंडा यांना मुख्यमंत्री बनले गेले. ते त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदी काम केले. उत्तर प्रदेशात ब्रजेश पाठक यांनाही भाजपाने उपमुख्यमंत्री केले. ते काँग्रेसमधून भाजपामध्ये आले.