छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:58 IST2026-04-15T16:57:10+5:302026-04-15T16:58:00+5:30
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने या माहितीचा वापर करून इराक, कतर आणि सौदी अरेबियातील आदी ठिकाणच्या अमेरिकन तळांवर जोरदार मिसाइल हल्ले चढवले.

छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
अमेरिका आणि इराणयुद्धामुळे मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. इराणने चिनी गुप्तचर सॅटेलाईट्सचा वापर करून अमेरिकन लष्करी तळांची रेकी केली आणि अचूक निशाणा साधत क्षेपणास्त्र हल्ले चढवले. 'फायनान्शिअल टाइम्स'ने इराणच्या लीक लष्करी कागदपत्रांच्या हवाल्याने हा खळबळजनक दावा केला आहे.
चिनी कंपनीचे 'अर्थ आय' तंत्रज्ञान -
फायनान्शिअल टाइम्स'च्या वृत्तानुसार, इराणने चीनच्या 'अर्थ आय' कंपनीने विकसित केलेल्या TEE-01B सॅटेलाईट्सच्या सेवा खरेदी केल्या होत्या. हे सॅटेलाईट्स लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच इराणी लष्कराच्या एरोस्पेस फोर्सने त्यांचा वापर केला. या उपग्रहांच्या मदतीने इराणने अमेरिकन मिलिट्री ठिकानांचे मॉनिटरिंग केले. यानंतर, सॅटेलाइटच्या सहाय्याने फोटोज आणि इतर महिती मिळवली.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने या माहितीचा वापर करून इराक, कतर आणि सौदी अरेबियातील आदी ठिकाणच्या अमेरिकन तळांवर जोरदार मिसाइल हल्ले चढवले.
चीनने वृत्त फेटाळले, ट्रम्प यांनीही दिला इशारा -
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. चीनवर अतिरिक्त टॅरिफ (कर) लावण्यासाठी हे रचलेले कारस्थान असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनवर इराणला शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून मदत केल्याचा आरोप केला आहे. मे महिन्यात होणाऱ्या आपल्या चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी चीनवर दबाव टाकण्यासाठी ५० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकीही दिली आहे.