“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:46 IST2026-04-16T12:46:11+5:302026-04-16T12:46:41+5:30
Lok Sabha Session 2026: सरकारने आधी जनगणना करावी आणि मग आरक्षण लागू करावे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
Lok Sabha Session 2026: लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४० असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सभागृहात २९३ सदस्य आहेत. महिला आरक्षण आणि परिसीमन यासंबंधीची तीन विधेयके मंजूर करून घेण्यासाठी, सर्व सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहून मतदान केले, तर एनडीएला ३६० खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवारी संसदेत एक विधेयक सादर केले जाईल. संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सदर विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केला.
लोकसभेत महिला आरक्षण कायद्याशी संबंधित तीन महत्त्वाची सुधारणा विधेयके सादर करण्यात आली. या विषयावर बोलावलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध केला. सपा खासदार धर्मेंद्र यादव यांनी या आरक्षण प्रणालीमध्ये मुस्लिम महिलांचाही समावेश करण्याची मागणी केली. या विधेयकाच्या प्रस्ताव सादर करण्याच्या बाजूने २५१ जणांनी मतदान केले. तर १८५ सदस्यांनी याला विरोध दर्शवला.
अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?
सपा खासदार अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाचे समर्थन करतो, पण सरकार घाई करत आहे. सरकारने आधी जनगणना करावी आणि मग आरक्षण लागू करावे. सरकारला माहित आहे की, जर त्यांनी जनगणना केली, तर आम्ही जातीच्या आधारावर आरक्षणाची मागणी करू. म्हणूनच ते आमची फसवणूक करून महिला सुधारणा विधेयक मंजूर करू पाहत आहेत. संपूर्ण देशाला अर्ध्या लोकसंख्येसाठी आरक्षण हवे आहे. मला विचारायचे आहे, या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का? असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.
दरम्यान, जोपर्यंत या विधेयकात मागासलेल्या आणि मुस्लिम समाजातील महिलांचा समावेश होत नाही, तोपर्यंत आम्ही समाजवादी त्याला पाठिंबा देणार नाही. या देशात समाजवाद्यांपेक्षा महिलांना अधिक पाठिंबा देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही. आजही समाजवादी पक्षात सर्वाधिक महिला खासदार आहेत, असे धर्मेंद्र यादव म्हणाले.