२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:55 IST2026-05-13T19:42:15+5:302026-05-13T19:55:02+5:30
20 Coach Vande Bharat Express Train: ८ कोचचे २० कोच केल्यानंतर या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यावरून वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे.

20 Coach Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता तसूभरही कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत ट्रेनमध्ये वेळोवेळी मोठे बदलही केले जात आहेत. यातच वंदे भारत ट्रेनबाबत भारतीय रेल्वेने केलेला एक प्रयोग भलताच यशस्वी झालेला दिसत आहे. केवळ १० दिवस तब्बल ४५ हजार प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केल्याचे समोर आले आहे.

Jammu Srinagar Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेने जम्मू ते श्रीनगर दरम्यान सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस सुपरहिट ठरत आहे. अलीकडेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३० एप्रिल रोजी २० कोचच्या जम्मू-तवी-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता.

वंदे भारत एक्स्प्रेस अलीकडेच जम्मू ते श्रीनगर दरम्यान धावू लागली आहे. यापूर्वी ही ट्रेन माता वैष्णो देवी कटरा ते श्रीनगर दरम्यान धावत असे. ही ट्रेन खूप लोकप्रिय झाली असून, गेल्या १० दिवसांत ४५ हजारहून अधिक प्रवाशांनी यातून प्रवास केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे.

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ट्रेन सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात (८ मे पर्यंत) २८,७६२ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला. यावरून नवीन ट्रेनबाब जनतेमध्ये असलेला प्रचंड उत्साह स्पष्टपणे दिसून येतो. काश्मीर खोऱ्याचा अनुभव घेण्यासाठी दररोज सरासरी २,५०० प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात.

वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास विमानापेक्षा खूपच कमी वेळेचा असल्यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या संख्येमुळे आनंदी झाल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून २०२५ रोजी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर काही महिन्यांनी श्रीनगरसाठी वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली.

त्यानंतर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३० एप्रिल रोजी अत्याधुनिक २० कोचच्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सध्या जम्मू ते श्रीनगर मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. याचा स्थानिक प्रवासी, पर्यटक यांना मोठा फायदा होत असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेन क्रमांक २६४०१ (जम्मू तवी ते श्रीनगर) आणि परतीची सेवा ट्रेन क्रमांक २६४०२ (श्रीनगर ते जम्मू तवी) मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावतात. तर ट्रेन क्रमांक २६४०३ (जम्मू तवी ते श्रीनगर) आणि परतीची सेवा ट्रेन क्रमांक २६४०४ (श्रीनगर ते जम्मू तवी) बुधवार वगळता सर्व दिवशी धावतात.

या दोन वंदे भारत ट्रेनच्या सेवांमुळे जम्मू-काश्मीर मार्गावर आठवड्यातून किमान पाच दिवस दररोज चार वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत असतात. प्रत्येक मंगळवार आणि बुधवारी दोन ट्रेन थेट धावतात, ज्यामुळे स्थानिक, पर्यटक, यात्रेकरू आणि व्यावसायिकांचा प्रवास अधिक सोपा होतो.

पूर्वी या ट्रेनला ८ कोच होते. ती नेहमीच पूर्ण भरलेली असायची. आता तर २० डब्यांची ट्रेनसुद्धा जवळपास पूर्ण भरलेली असते. यावरून या मार्गावरील प्रचंड मागणी स्पष्टपणे दिसून येते. केवळ शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांत ११ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

आकडेवारी पाहिल्यास १० मे रोजी वंदे भारत ट्रेनमधून सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला. ३ मे रोजी ४,९७७, ८ मे रोजी ४,९५५, ९ मे रोजी ५,२८४, १० मे रोजी ५,६५७ आणि ११ मे रोजी ५,०२४ प्रवाशांनी प्रवास केला.

सुमारे २६६ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर आता दोन वंदे भारत ट्रेनच्या धावत आहेत. ज्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्रवाशांना किमान एक आणि बहुतेक दिवशी दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्या दिवशी दोन्ही वंदे भारत ट्रेन धावतात, त्या दिवशी प्रवासी वाहतूक जवळपास पूर्ण क्षमतेने केली जाते आणि प्रवाशांची संख्याही जास्त असते.

या वंदे भारत ट्रेनचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे आता ती जम्मू आणि श्रीनगर दरम्यान थेट प्रवास उपलब्ध करून देते. यात्रेकरू, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि व्यावसायिक आता सहजपणे प्रवास करत आहेत.

ही ट्रेन उणे २० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानातही धावू शकते. जेव्हा बर्फवृष्टी किंवा भूस्खलनामुळे रस्ते पूर्णपणे बंद होतात, तेव्हा हा सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरतो, असे म्हटले जात आहे. या भागातील हवामान लक्षात घेता, ही ट्रेन काही विशेष सुविधांसह बनवण्यात आली आहे.

विशेषत: जेव्हा हिवाळ्यात तापमान शून्यापेक्षा खूप खाली जाते, तेव्हा रेल्वेच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला त्याचा परिणाम होतो. म्हणून या वंदे भारत ट्रेनच्या अंतर्गत भागात तापमान सुसह्य राहण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये अनेक गोष्टींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

वंदे भारत ट्रेनच्या वॉटर टँकमध्ये सिलिकॉन हिटिंग पॅड आणि हिटिंग प्लंबिंग पाइप बसवण्यात आले आहेत. यामुळे ट्रेनमधील पाणी गोठणार नाही. या ट्रेनच्या पायलट केबिनमध्ये ट्रिपल एअर विंडस्क्रीन पाहायला मिळणार आहे. म्हणजे ट्रेनच्या चालकासाठी हिटरची सुविधा असणार आहे. तसेच या ट्रेनच्या आतील काही भागांमध्ये तसेच वॉशरुममध्ये हिटरची सोय देण्यात आली आहे.

















