आयपीएल २०२६ मध्ये धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्सचा संघ सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. या संघाने सलग चार सामने गमावले आहेत. यामुळे संघाचा प्ले-ऑफचा मार्ग खडतर बनला आहे. मात्र, असे असले तरी, संघाचा युवा सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने हार मानलेली नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याने चाहत्यांना भावणिक साद घालत, संघाची साथ न सोडण्याचे आवाहन केले आहे.
प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे आवश्यक -
खरेतर, या हंगामाच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी केली. महत्वाचे म्हणजे, सुरुवातीचे सलग सहा सामने जिंकल्याने पंजाबला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यानंतर संघाची लय बिघडली आणि सलग पराभवाची मालिका सुरू झाली. सध्या ११ सामन्यानंतर पंजाबच्या खात्यात १३ गुण असून, प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. अशा एकूण परिस्थितीत प्रभसिमरनने चाहत्यांशी संवाद साधत संघाला साथ देण्याची विनती केली. तसेच, संघाचा आत्मविश्वास उंचावण्याचाही प्रयत्न केला.
'करो या मरो' -
पंजाब किंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रभसिमरन म्हणाला, "संघ अजूनही जोरदार पुनरागमन करू शकतो. त्याने चाहत्यांना धर्मशाला स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्लेयर्सचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले. "सलग चार पराभवानंतरही आमचा आत्मविश्वास तुटलेला नाही. आम्ही प्ले-ऑफमध्ये जागा मिळवू आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावू," असा विश्वासही त्याने व्यक्त केला. एका प्रकारे त्याने चाहत्यांना आपल्यावर विश्वास ठेवण्याचेच आवाहन केले आहे. पंजाबचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी 'करो या मरो' असणार आहे.