उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 20:39 IST2026-05-13T20:37:48+5:302026-05-13T20:39:38+5:30
Eknath Shinde EV car travel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद; विरोधकांनाही राजकारण न करण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
Eknath Shinde EV car travel: कोविड काळात देशातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे भारत सुरक्षितपणे कोविड संकटातून बाहेर पडला. आता देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही नागरिकांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते ठाणे ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्याची मोदींनी आजपासून अंमलबजावणी सुरू केली. तर त्यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाण्यासाठी त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. त्यासोबतच आपल्या ताफ्यातील वाहने देखील कमी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यात आपल्याला सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांची वाहने सोडल्यास अन्य वाहने सोबत ठेवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी देशात काटकसरीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून इंधन बचतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल आयात करतो, त्यामुळे त्यावरील खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने इंधनाचा संयमित वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचा उल्लेख करत त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. “देशातील जनता सुज्ञ आहे. ‘हे पब्लिक है, सब जानती है’, त्यामुळे विरोधकांनी या विषयात राजकारण न करता राष्ट्रहितासाठी सरकारच्या आवाहनाला साथ द्यावी,” असे आवाहन शिंदे यांनी केले.
“मोदीजी हे नेहमी ‘नेशन फर्स्ट’ हा विचार ठेवून निर्णय घेतात. त्यामुळे मी ही आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. तसेच राज्यातील शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनाही इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्य सरकार पूर्ण क्षमतेने प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. “युद्धजन्य परिस्थितीचा कमीत कमी फटका देशातील नागरिकांना बसावा, हा या आवाहनामागील मुख्य उद्देश आहे,” असे ते म्हणाले. यावेळी विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, अशा गंभीर परिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही. “राजकारण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संधी असतात, मात्र राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधक केवळ मोदीजींना बदनाम करण्यासाठी टीका करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
मंत्र्यांनी आणि विभागांनी परदेश दौऱ्यांना लावली कात्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपला कौटुंबिक युरोप दौरा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे नगरविकास दोन विभागातर्फे डेन्मार्क मध्ये आयोजित केलेला परदेश दौराही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.