"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:23 IST2026-05-13T19:15:19+5:302026-05-13T19:23:27+5:30
"होसाबाळे पुढे म्हणाले, "सत्य असे आहे की, सध्या मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेतृत्वाचा आभाव आहे, जे स्वातंत्र्य लढावेळी होते. आता तसे लोक मिळणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारतात ढोंगी धर्मनिरपेक्ष पक्ष उदयास आले आणि त्यांच्या धोरणांमुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे."

"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी देशातील मुस्लीम नेतृत्वाच्या सद्यस्थितीवर मोठे विधान केले आहे. "आजच्या काळात मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेतृत्व मिळणे कठीण झाले आहे. केवळ फुटीरतावादी विचार मांडणाऱ्या नेत्यांनाच समुदायाचा पाठिंबा मिळत असल्याची स्थिती आहे," असे होसबळे यांनी म्हटले आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपले मत मांडले.
ओवैसी म्हणतात की तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांचे प्रश्न उपस्थित करत नाहीत, यामुळे त्यांना न्याय मिळत नाही, असा प्रश्न विचारला असता होसबळे म्हणाले, "हे ओवैसींवरच सोडायला हवे. शिवाय, त्यांच्याच धर्मातील लोक या विषयाकडे कसे बघतात, तेही बघायला हवे." होसाबाळे पुढे म्हणाले, "सत्य असे आहे की, सध्या मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेतृत्वाचा आभाव आहे, जे स्वातंत्र्य लढावेळी होते. आता तसे लोक मिळणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारतात ढोंगी धर्मनिरपेक्ष पक्ष उदयास आले आणि त्यांच्या धोरणांमुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे."
"आजही काही राष्ट्रवादी मुस्लिम नेते समाजात आहेत, मात्र त्यांना समुदायाची साथ मिळत नाही. जर एखाद्या मुस्लीम नेत्याला मोठे समर्थन हवे असेल, तर त्याला फुटीरतावादी भूमिका घ्यावी लागते. ही आजची शोकांतिका आहे," असेही होसबळे म्हणाले. "कोणत्याही समाजाने स्वतःचे नेतृत्व तयार करणे चुकीचे नाही. मात्र, राजकीय पक्षांची स्थापना केवळ धर्माच्या आधारावर होणे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना होसबळे म्हणाले, भारताचे संविधान सर्वांना सामावून घेण्याची भाषा करते, परंतु जेव्हा राजकारण केवळ धर्माभोवती फिरते, तेव्हा खऱ्या समस्यांना सुरुवात होते. आज देशात धर्माच्या आधारावर चालणारे अनेक पक्ष आपल्याला दिसतात. केरळमध्ये ख्रिस्ती समाजाशी संलग्न असलेले पक्ष आहेत. त्याचप्रमाणे, शीख-आधारित पक्षही आहेत. या विषयावर देशात सखोल चर्चा होण्याची गरज आहे. दरम्यान, पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि संपूर्णानंद यांच्यासारख्या नेत्यांनीही यावर पूर्वी विचारमंथन केले होते, असेही ते यावेळी म्हणाले.