नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:56 IST2026-05-13T16:41:35+5:302026-05-13T16:56:49+5:30
PM Narendra Modi: देशवासियांना आवाहन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यात मोठा बदल केला आहे.

नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
PM Modi Convoy: जागतिक स्तरावर निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी केवळ दोन गाड्यांच्या ताफ्यासह कॅबिनेटच्या बैठकीला पोहोचले. इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे पाऊल उचलले जेणेकरून इतरांनाही याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल.
सुरक्षा कायम, पण साधेपणावर भर
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या प्रोटोकॉलमध्ये कोणतीही तडजोड न करता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. नवीन व्यवस्थेनुसार, आता केवळ अत्यंत आवश्यक असलेली सुरक्षा वाहनेच ताफ्यात असतील. एका गाडीत पंतप्रधान स्वतः होते, तर दुसऱ्या गाडीत एसपीजीचे कमांडो तैनात होते. अनावश्यक गाड्या हटवून ताफा अधिक सक्षम बनवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. तसेच, भविष्यात ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.
देशवासीयांना आवाहन
पंतप्रधान मोदींनी सलग दोन दिवस देशातील जनतेला काही महत्त्वाचे संकल्प करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीने करावा, प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच परकीय चलन वाचवण्यासाठी किमान एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा आणि परदेश दौऱ्यांऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्या अशी आवाहने केली आहेत.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi has reduced his convoy size significantly. Reduction in vehicles was done while maintaining essential security components as per SPG protocol. pic.twitter.com/kuC9OfyAxN
— ANI (@ANI) May 13, 2026
पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल
पंतप्रधानांव्यतिरिक्त, इतर मंत्री आणि नेत्यांनीही त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या ताफ्याचा आकार निम्म्याहून अधिक कमी केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा आणि महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.