PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:39 IST2026-05-13T16:30:14+5:302026-05-13T16:39:14+5:30
आता सोने आणि चांदीवरील आयात शुल्कातही १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्षापर्यंत सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, यानंतर आता सोने आणि चांदीवरील आयात शुल्कातही १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वाढता जागतिक तणाव, युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांमुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावरही मोठा ताण येत आहे. सोन्याच्या आयातीसाठी देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. हाच बोजा कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी सोन्याचा उल्लेख वारंवार केला, मात्र चांदीसंदर्भात त्यांनी कसलेही भाष्य केले नाही.

भारत हा सोन्याचा जगातील तिसरा मोठा ग्राहक आहे. भारत ९० ते ९५ टक्के सोने आयात करतो. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सोन्याची आयात २४ टक्क्यांनी वाढून ७२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

याउलट, चांदीच्या आयातीचा विचार करता, भारताने १२ अब्ज डॉलरची चांदी आयात केली आहे. ही रक्कम सोन्याच्या तुलनेत फारच कमी आहे. भारत आपली ८० टक्के चांदी आयात करतो आणि उर्वरित गरज देशांतर्गत खाणकामातून पूर्ण केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचा उल्लेख केला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे चांदीची औद्योगिक उपयुक्तता. चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच नाही, तर ईव्ही (EV) सेक्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक्स आणि हेल्थकेयर यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होतो.

वैद्यकीय उपकरणे आणि 'अँटी-बॅक्टेरियल एजंट' म्हणूनही चांदी आवश्यक असल्याने तिच्या वापरावर निर्बंध आणणे शक्य नाही. दरम्यान, या निर्णयामुळे गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी चांदीकडे वळण्याची शक्यता आहे.

१३ मे रोजी चांदीच्या दरात १८,००० रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली असून, १ किलो चांदीचा भाव २.८७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. येत्या काळात यात अधिक तेजी येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.


















