सौदी अरेबिया महाराष्ट्राला देणार मोठा धक्का?; ४४ अब्ज डॉलरचा करार रद्द होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 10:48 AM2020-08-23T10:48:16+5:302020-08-23T10:51:56+5:30

सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोनं चीनला मोठा धक्का दिला आहे. चीनसोबतचा १० अब्ज डॉलरचा (जवळपास ७५ हजार कोटी) करार रद्द केला आहे.

अराम्को कंपनी चीनसोबत मिळून एक तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल्स संकुल उभारणार होती. मात्र हा करार सौदीनं अचानक रद्द केला आहे. हा चीनला मोठा झटका मानला जात आहे.

कोरोना संकट काळात खनिज तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना मोठं नुकसान सहन करायला लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून अराम्कोनं चीनसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसच कोरोना प्रकोप रोखू शकते. कोरोनावरील लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होणार आहे.

सौदी अराम्कोनं रद्द केलेल्या करारावर भाष्य करण्यास नकार दिला. तर अराम्कोची चिनी भागीदार कंपनी असलेल्या नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन आणि पंजीन सिनसेनदेखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोरोनामुळे जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत आहे. इंधनाला फारशी मागणी नसल्यानं सौदीला मिळणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे सौदी सरकार अडचणीत आलं आहे.

सौदी अराम्कोच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यानं त्यांनी चीनसोबतचा करार रद्द केला. आता पुढचा क्रमांक भारताचा असू शकतो. भारतासोबतचा करारदेखील सौदी अराम्कोकडून रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

सौदी अराम्कोनं भारतासोबत ४४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. विशेष म्हणजे सौदी अराम्को महाराष्ट्रात रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. तशी घोषणा अराम्कोनं केली आहे.

नाणारमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा अराम्कोचा मानस आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आधीच प्रकल्प अडचणीत सापडला आहे.

आता सौदी अराम्कोला आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्यानं त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसू शकेल. तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्यास तो राज्यासाठी मोठा हादरा असेल.