Infosys Job: असं म्हणतात की जिथे जिद्द असते तिथे मार्ग आपोआप सापडतो. जगभरातील टेक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवत असताना, भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसनं एक आदर्श घालून दिला आहे. कंपनीच्या सीईओंच्या म्हणण्यानुसार, एआयचा वापर वाढवूनही त्यांच्याकडे कोणतीही कर्मचारी कपात केली जाणार नाही. तसंच, २०२६ मध्ये २०,००० पेक्षा जास्त फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आहे. तंत्रज्ञानाच्या नावाखाली कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांसाठी इन्फोसिसची ही घोषणा एक धडा आहे.
मनीकंट्रोलशी बोलताना इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांनी महत्त्वाची माहिती दिली. कंपनी गरजेनुसार एआय लागू करेल. मात्र, असं असूनही नोकरभरती थांबवली जाणार नाही. या काळात कोणतीही नोकरकपात न करण्याची योजना कंपनीने आखली असं पारेख म्हणाले. "आम्ही गेल्या वर्षीही कोणतीही कर्मचारी कपात केली नव्हती आणि भविष्यातही तसा कोणताही विचार नाही. ऑटोमेशन आणि वर्कफोर्स रिस्ट्रक्चरिंग असूनही कंपनीला कोणाचीही नोकरी घालवायची नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कॅम्पस हायरिंगवर राहणार भरतीचा फोकस
बंगळुरूच्या या आयटी कंपनीनं ऑटोमेशनच्या काळात नोकरकपातीऐवजी भरती करण्याची योजना आखली आहे. सीईओ पारेख यांनी सांगितलं की, यावर्षीही कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून २०,००० हून अधिक पदवीधरांची भरती केली जाईल. गेल्या वर्षीही कंपनीने एवढ्याच फ्रेशर्सना कामावर घेतलं होतं. पारेख यांच्या मते, एआयचा वापर काम वाढवतो, कमी करत नाही. कंपनीतील एंट्री लेव्हलच्या कामांसाठी तंत्रज्ञानासोबतच कर्मचाऱ्यांचीही गरज असते.
इतर कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात
इन्फोसिस ऑटोमेशन असूनही कर्मचारी कपात न करण्यावर ठाम असताना, अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. टीसीएसनं (TCS) गेल्या वर्षी जुलैमध्ये सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. याशिवाय एचसीएल टेक, ओरॅकल, कॉग्निझंटसह इतर अनेक कंपन्यांनीही अनेकांना नारळ दिलाय. अशा परिस्थितीत, इन्फोसिसची ही घोषणा केवळ कौतुकास्पद नसून इतर कंपन्यांसाठी एक धडा देखील आहे.
एआय बदल घडवेल, विनाश नाही
पारेख म्हणाले की, एआयचा वापर तांत्रिक कंपन्यांमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणेल, कर्मचारी कपातीद्वारे विनाशाचं कारण ठरणार नाही. सध्या एआयमुळे नोकऱ्या जातील अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. मात्र, एआय कामाची व्याप्ती वाढवेल, ती कमी करणार नाही. फ्रेशर्सच्या भूमिकेत आता बदल केला जाईल आणि त्यांना भविष्यासाठी तयार केलं जाईल. इन्फोसिस फ्रेशर्सना एआय टूल्ससह आणि एआय टूल्सशिवाय काम करण्याचं प्रशिक्षण देईल.
