NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:35 IST2026-05-19T10:55:18+5:302026-05-19T11:35:17+5:30

विद्यार्थ्यांकडून नेमकी किती फी घेत होता मोटेगावकर? RCC क्लासचा आर्थिक हिशोब चर्चेत

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाचं कनेक्शन लातूरमधल्या प्रसिद्ध अशा रेणुकाई करिअर सेंटरचे (आरसीसी) क्लासेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आरसीसी क्लासेसचा संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकरला सीबीआयने अटक करत नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. याशिवाय १० दिवस आधीच म्हणजे २३ एप्रिललाच मोटेगावकरकडे नीटची प्रश्नपत्रिका आली होती, असाही आरोप आहे.

स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी अधिक गुण मिळावेत, यासाठीच मोटेगावकर यांनी पेपरफूट केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मोटेगावकर हा प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि पसरवण्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य होता.

केवळ लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसच्या शाखा आहेत.

उत्तम मार्क पडण्याचे आश्वासन मोटेगावकरच्या या आरसीसी क्लासेसमध्ये दिलं जायचं. NEET आणि JEE चे विशेष वर्गही चालवले जायचे. पण, यासाठी मोटेगावकर विद्यार्थ्यांकडून किती फी घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का?

आरसीसी क्लामध्ये अॅडमिशन घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला तब्बल काही लाख रुपये मोजावे लागायचे. अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी २ लाख ४० हजार फी घेतली जायची.

तर फक्त बारावीसाठी अॅडमिशन घ्यायचं असेल तर १ लाख २० हजार इतकी फी विद्यार्थ्यांचे पालक भरायचे.

फक्त PCB (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) किंवा PCM (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) अशा विशिष्ट विषयांच्या ग्रुपसाठी ६० हजार इतकी फी होती.

दरवर्षी हजारो विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये प्रवेश घ्यायचे. त्याच्या क्लासचा वर्षाचा टर्नओव्हर हा जवळपास १०० कोटी इतका असल्याचं सांगण्यात येत आहे.